रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या संघाच्या गोलंदाजांमध्ये अपेक्षित चमक नसल्याचं स्पष्ट मत मांडलं आहे. आयपीएलमध्ये पुढील प्रवासात गोलंदाज चांगली कामगिरी करत नसल्यास फलंदाजांना याची किंमत चुकवावी लागणार आहे. गुरुवारी बंगळुरुच्या खात्यात पाचव्या पराभवाची नोंद झाली. "मी जर बँटिंगचा विचार करुन बोललो तर आम्हाला 200 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. गोलंदाजी विभागात आमच्या भात्यात फारशी शस्त्रं नाहीत. त्यामुळे सर्व जबाबदारी फलंदाजांवर येत आहे," असं फाफ डू प्लेसिसने म्हटलं आहे.
"गोलंदाजीच्या बाबतीत आम्ही अद्याप चांगली कामगिरी केलेली नाही. पॉवर प्लेमध्ये आम्ही 1 ते 2 विकेट घेणं अपेक्षित आहे. पहिल्या चार ते पाच ओव्हरमध्ये आम्ही नेहमी बॅकफूटवर असतो असं मला वाटत आहे," असं परखड मत फाफ डू प्लेसिसने मांडलं आहे. मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून बंगळुरुचा दणदणीत पराभव केला. बंगळुरु संघाला आणखी काही धावांची गरज होती असं फाफ डू प्लेसिसने म्हटलं आहे. तसंच सेकंड इनिंगमध्ये मैदानात दव असल्याने त्याचा फार फरक पडल्याचंही त्याने सांगितलं आहे.
"मैदान ओलं असल्याने फार आव्हान निर्माण झालं होतं. माझ्या मते टॉस जिंकला तर चांगलं होईल. मुंबई इंडियन्सलाही क्रेडिट दिलं पाहिजे. त्यांनी आमच्या गोलंदाजांना फार चुका करण्यास भाग पाडलं. जो येईल तो चांगली फलंदाजी करत होता. आम्ही दवाबद्दल बोलले. मला माहिती होतं की त्याने फार फरक पडणार आहे. आम्हाला 215 ते 220 धावांची गरज होती. 190 धावा पुरेशा नव्हत्या. जेव्हा मैदानात दव असतं तेव्हा स्थिती नंतर फार कठीण होते. आम्ही अनेकदा चेंडूही बदलला. हा एकमेव खेळ आहे जिथे स्थिती बदलली तर त्याचा खेळावर फरक पडतो," असं फाफ डू प्लेसिसने सांगितलं आहे.
फाफ डू प्लेसिसला यावेली जसप्रीत बुमराहच्या (5/21) कामगिरीविषयी विचारण्यात आलं असता त्याने कौतुक केलं. "दोन्ही डावात त्याने आपल्या खेळीने फरक पाडला होता. आम्ही त्यांच्या गोलंदाजांना दबावात टाकलं होतं. पण त्याने एकट्याने सामन्यावर प्रभाव पाडला".
"तुम्हाला माहित आहे की तुम्ही त्याला आणू शकता आणि विकेट घेऊ शकता. तसंच बचावात्मक देखील होऊ शकता," असं कौतुक मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने केलं आहे. बुमराहच्या कामगिरीने त्यालाही प्रभावित केलं आहे. "मी नशिबवान आहे की, बुमराह माझ्या बाजूने आहे. तो नेहमी अशी कामगिरी करतो. तुम्ही त्याला सांगा आणि तो विकेट मिळवून देईल. तो नेटमध्ये सराव करत असतो. त्याच्याकडे इतका अनुभव आणि आत्मविश्वास आहे," असं हार्दिक पांड्या म्हणाला आहे.
हार्दिक पांड्याने यावेळी सूर्यकुमार यादवचंही कौतुक केलं. सूर्यकुमारने 19 चेंडूत 52 धावा केल्या आणि संघाला अत्यंत सहजपणे 197 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यात मदत केली. "त्याने अर्धशतक ठोकल्यानंतर मी त्याला तुझं स्वागत आहे म्हटलं. तो अशा ठिकाणी फटके मारतो, जे कोणीही खेळू शकत नाही," असं हार्दिक पांड्या म्हणाला आहे.