भारतीय क्रिकेटर संघाचा यष्टीरक्षक ईशान किशन (Ishan Kishan) गेल्या काही दिवसांपासून संघापासून दूर आहे. ईशान किशनच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन सामन्यात के एस भरत (KS Bharat) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यांना संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान ईशान किशनने संघ व्यवस्थापनाकडे विश्रांती मागितली होती. पण तेव्हापासून तो संघात परतलेलाच नाही. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) ईशान किशन संघात कधी परतेल असं विचारण्यात आलं होतं. त्यावर त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला थोडं क्रिकेट खेळावं लागेल असं उत्तर दिलं होतं.
राहुल द्रविडने स्पष्ट शब्दांत क्रिकेट खेळ सांगितलं असतानाही ईशान किशनने मात्र तो धुडकावला असल्याचं दिसत आहे. याचं कारण ईशान किशनने रणजी ट्रॉफीपासून अंतर ठेवलं आहे. तर दुसरीकडे एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ईशान किशन गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासह सराव करत आहे. रिलायन्स स्टेडिअममध्ये तो पांड्या भावांसह सराव करत असल्याची माहिती आहे.
"तो जेव्हा कधी तयार असेल. मी असं म्हणत नाही की त्याने स्थानिक क्रिकेट खेळायला हवं. मी म्हणत आहे की, तो जेव्हा कधी तयार असेल तेव्हा त्याने थोडं क्रिकेट खेळायला हवं आणि संघात पुनरागमन करावं. निर्णय त्याचा आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी त्याच्यावर दबाव टाकत नाही आहोत. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत," असं राहुल द्रविडने दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर विशाखापट्टणम येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं.
Cricbuzz मधील रिपोर्टनुसार, ईशान किशन गेल्या काही आठवड्यांपासून बडोदामधील रिलायन्स स्टेडिअममध्ये पांड्या बंधूंसह सराव करत आहे. ईशान किशनच्या या कृत्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचं कारण हार्दिक पांड्या आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. आणि ईशान किशनही मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू किरण मोरे यांच्यानुसार, किशन त्यांच्या अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे.
ईशान किशन नोव्हेंबर महिन्यापासून भारतीय संघाकडून खेळलेला नाही. कोणत्याही प्रकारात तो खेळला नसून, काही सामन्यांमध्ये बेंचवर होता.
भारताचा प्रतिभावान यष्टीरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान किशनने रणजी ट्रॉफीसारखे स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याकडे कोणताही कल दाखवला नाही. निवडकर्त्यांना त्याची निवड करण्यासाठी काही क्रिकेट खेळलं पाहिजे असा सल्ला राहुल द्रविडने दिल्यानंतरही ईशान किशनने तो गांभीर्याने घेतलेला नाही.
इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यांनंतर बीसीसीआय आता तिसऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा करणार आहे. या संघात ईशान किशनचा समावेश असेल की नाही याबद्दल अद्याप काही स्पष्टता नाही.