जसप्रीत बुमराह भारत देश सोडणार होता; 'या' देशाकडून खेळणार होणार होता क्रिकेट; स्वत: केला खुलासा

जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तो चांगल्या संधीच्या शोधात कॅनडाला (Canada) जाण्याची तयारी करत होता. त्यानेच मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 11, 2024, 06:58 PM IST
जसप्रीत बुमराह भारत देश सोडणार होता; 'या' देशाकडून खेळणार होणार होता क्रिकेट; स्वत: केला खुलासा  title=

भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक मोठे खेळाडू दिले आहेत. पण भारतीय संघावर नेहमीच फक्त चांगले फलंदाज तयार केले जात असल्याची टीका करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र बदललं आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार असे एकापेक्षा एक सरस गोलंदाज भारतीय संघाला सापडले आहेत. त्यातच जसप्रीत बुमराहच्या रुपात भारताला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्तम गोलंदाज लाभला आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री जेव्हा भारतीय गोलंदाजीची धार वाढवण्याच्या प्रयत्नात होते तेव्हाच बुमराह ताफ्यात दाखल झाला होता. गोलंदाजीची वेगळी स्टाईल आणि यॉर्करने त्याने फलंदाजांमध्ये आपली दहशतच निर्माण केली. 

जसप्रीत बुमरहामुळे आज भारतीय संघ सर्वोत्तम संघांच्या यादीत आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा जसप्रीत बुमराह भारत सोडण्याचा विचार करत होता. मूळचा गुजरातच्या असणारा जसप्रीत बुमराह चांगली संधी मिळण्याच्या शोधात कॅनडाला जाणार होता. पण मुंबई इंडियन्स संघात त्याला संधी मिळाली आणि पुढे जे काही झालं तो इतिहास आहे. 

जसप्रीत बुमराहची पत्नी संजनाने त्याची जिओ सिनेमावर मुलाखत घेतली. यावेळी तिने विचारलं की, "तू कॅनडाला जाण्यासाठी इच्छुक होता, तिथे जाऊन तुला नवं आयुष्य सुरु करायचं होतं?".

यावर उत्तर देताना जसप्रीत बुमराह म्हणाला की, "आपण याआधीही या विषयावर बोललो आहोत. प्रत्येक मुलाला क्रिकेट खेळत मोठा खेळाडू होण्याची इच्छा असते. भारतातील प्रत्येक रस्त्यावर जवळपास 25 खेळाडू आहेत, ज्यांना भारतासाठी खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळे तुमच्याकडे बॅकअप प्लॅन असायला हवा. आपले नातेवाईक तिथे राहतात. मी विचार केला होता की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथे माझ्या काकांकडे जायचं. आम्ही संपूर्ण कुटुंब तिथे जाण्याचा विचार करत होतो. पण तिथे संस्कृती वेगळी असल्याने माझ्या आईने जाण्यास नकार दिला".

पुढे तो म्हणाला की, "मी फार आनंद आणि नशिबवान आहे की, गोष्टी घडत गेल्या. अन्यथा कदाचित मी कॅनडाच्या संघाकडून खेळण्यासाठी प्रयत्न केला असता आणि तिथेही काहीतरी केलं असतं. येथेच सर्व काही झालं याचा आनंद आहे. मी आता भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे".

दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने भारतीय टी-20 वर्ल्डकप संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मयांक यादव असावेत असं मत मांडलं आहे. 

"जर मला अजित आगरकरच्या भूमिकेत टाकलं तर मी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मयांक यादव यांना संघात स्थान देईन. मयांकचा फॉर्म, अॅक्शन आणि रिलीज पाहता तो अतिशय नियंत्रणात आणि संधी दिल्यास मोठी कामगिरी करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडूंची विकेट घेण्याची संधी मिळत असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला असेल," असं मनोज तिवारीने म्हटलं आहे.