Jasprit Bumrah ruled out of IPL: भारतीय क्रिकेट चाहते आणि इंडियन प्रिमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयपीएल 2023 मध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सामन्यामध्येही बुमराह संघाबाहेरच असेल असं स्पष्ट झालं आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय सध्या बुमराह आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी चर्चा करत आहे. या चर्चेनंतर लवकरच बुमराहच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बुमराह जखमी झाला. त्याला पाठीसंदर्भातील समस्या आहे. मागील वर्षी आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्येही त्याला खेळता आलं नाही ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार तो आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपही खेळमार नाही. भारतीय चाहते आता बुमराह किमान या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवस क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत तरी दिसावा यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र बुमराहच्या गुडघ्यावर सर्जरी करावी लागणार असल्याचं निश्चित आहे.
बुमराहने डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा गोलंदाजीचा सराव सुरु केला होता. त्यामुळेच निवड समितीने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या व्हाइट बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी संघात स्थान दिलं होतं. मात्र तो पूर्णपणे फिट नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयपीएलआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण दुखापतीमुळे त्याची संघात निवड करण्यात आली नाही. सध्या बुमराहच्या जागी भारतीय संघाच्या गोलंदाजीची धूरा मोहम्मद शामीबरोबरच मोहम्मद सिरीज, उमरान मलिक, अर्शदिप सिंह या नवीन खेळाडूंनी अगदी सक्षमपणे पेलली आहे. त्यामुळे बुमराहची फारशी उणीव संघाला जाणवली नाही. अर्थात बुमराह हा उत्तम गोलंदाज आहे. मात्र तो नसल्याने संघ फारसा अडचणीत आला आहे असं मागील काही महिन्यांमध्ये दिसून आलेलं नाही.
एशिया कपबरोबरच (Asia Cup) मागील वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही बुमराह टीम इंडियामध्ये नव्हता. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बुमहारच्या फिटनेससंदर्भात मध्यंतरी सविस्तर खुलासा केला होता. चेतन शर्मा यांनी बुमराहची दुखापत गंभीर होती असं म्हटलं होतं. त्यानंतर भारतीय टीम मॅनेजमेंटने त्याला वर्ल्डकपमधून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराह टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू होता, पण तो पूर्णपणे फिट नव्हता. पण त्यानंतरही त्याला खेळवण्यात आलं, असा दावाही शर्मा यांनी केला.