World Test Championship | इंग्लंड दौऱ्याआधी 'या' दिग्गजाचा विराटला सल्ला, म्हणाला...

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया 2 जूनला रवाना होणार आहे.  

Updated: May 28, 2021, 04:16 PM IST
World Test Championship | इंग्लंड दौऱ्याआधी 'या' दिग्गजाचा विराटला सल्ला, म्हणाला...

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अजिंक्यपदासाठी (World Test Championship Final 2021) लवकरच टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्यासाठी आता महिन्याभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचे माजी कर्णधार (Kapil Dev) कपिल देव यांनी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) महत्वाचा सल्ला दिला आहे. (kapil dev given suggestion to team india captain virat kohli not get aggressive before world test championship final 2021 and england tour)

कपिल देव यांचा विराटला सल्ला  

"विराट गेल्या काही महिन्यांपासून शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. पण, तो सातत्याने धावा करतोय. इंग्लंडमध्येही तो धावा करेल, अशी आशा आहे. पण विराटने असं करताना स्वत:वर संयम ठेवायला हवा. तो फार उत्साही आहे. त्याचा स्वभावच तसा आहे. मला भिती आहे की त्याने फार आक्रमक होऊ नये. विराटने प्रत्येक सत्रात संयम बाळगायला हवा. विराटने आक्रमक होण्याऐवजी प्रतिस्पर्धी संघावर वरचढ होण्याच्या संधीची वाट पाहावी", असा मोलाचा सल्ला कपिल देव यांनी विराटला दिला. ते एका मुलाखतीत बोलत होते. यावेळेस त्यांनी विराटला हा सल्ला दिला.

"विराटला धावा कराव्या लागतील. सोबतच विराटला आक्रमक होता कामा नये. इंग्लंडमधील परिस्थिती आपल्यासाठी प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काहीही सहजासहजी साध्य होणार नाही. इंग्लंडमध्ये चेंडूच्या हालचालीवर लक्ष ठेवावं लागेल. जर तुम्ही सीम आणि स्विंग गोलंदाजीचा संयमाने सामना केला तर, तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल", असा कानमंत्रही देव यांनी दिला.  

18 जूनपासून रंगणार थरार 

अजिंक्यपदासाठीचा सामना 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये रंगणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. हा सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. आधी या सामन्याचे आयोजन क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्समध्ये करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे हा सामना साऊथम्पटनमध्ये शिफ्ट करण्यात आला. 

इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 14 सप्टेंबरला या दौऱ्याचा शेवट होणार आहे. 

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल आणि रिद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट बंधनकारक). 

राखीव खेळाडू : अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नगवासवाला.