कोलंबो : श्रीलंका क्रिकेटने बुधवारी पहिली लंका प्रिमियर लीग 21 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. जेणेकरुन स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना श्रीलंका सरकारच्या क्वारंटाईन काळ पूर्ण करण्यासाठी वेळ मिळणार आहे. पूर्व-निर्धारित वेळापत्रकानुसार ही टी -20 स्पर्धा 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती, परंतु आता बदल झाल्यानंतर 21 नोव्हेंबरपासून याची सुरुवात होईल.
एलपीएल टूर्नामेंटचे संचालक रेवीन विक्रमरत्ने म्हणाले की, "आयपीएल 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. एलपीएलमध्ये खेळू इच्छीत असलेल्या खेळाडूंना वेळ मिळावा म्हणून तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या लीगमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तानचे अव्वल खेळाडू खेळत आहेत.
एलपीएलची ही लीग दुसऱ्यांदा कोरोनामुळे पुढे ढकलावी लागली आहे. सुरुवातीला ते 28 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान ही लीग आयोजित केली गेली होती. श्रीलंकेतील तीन आंतरराष्ट्रीय मैदानावर सामने होणार आहेत. 15 दिवसांच्या या स्पर्धेत पाच संघांमध्ये 23 सामने खेळले जातील. कोलंबो, कॅंडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना अशी टीमची नावे आहेत.