२०१९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 27, 2018, 10:52 PM IST
२०१९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी  title=

हरारे : एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले. पण याच टीमवर २०१९ सालचा वर्ल्ड कप न खेळण्याची नामुष्की ओढावू शकते. वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करण्यासाठी आता वेस्ट इंडिजला क्वालिफायर मॅच खेळाव्या लागणार आहेत. ४ मार्च ते २५ मार्चदरम्यान झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायर मॅच खेळवण्यात येणार आहेत. या क्वालिफायर मॅचपूर्वी झालेल्या सराव सामन्यामध्ये अफगाणिस्ताननं वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.

३० सप्टेंबर २०१७च्या आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये टॉप ८ टीममध्ये नसल्यामुळे वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या देशांना क्वालिफायर मॅच खेळाव्या लागणार आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये भाग घेणाऱ्या टीमचा पाच-पाचचा ग्रुप बनवण्यात आला आहे. वेस्ट इंडिज, आयर्लंड, नेदरलँड, पपुआ न्यूगिनी आणि युएई या टीम ए ग्रुपमध्ये आणि अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग आणि नेपाळ या टीम ग्रुप बीमध्ये आहेत.

आयसीसी क्रिकेट क्वालिफायरच्या ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळेल. यानंतर ग्रुप स्टेजमधल्या टॉप ३ टीम सुपर सिक्समध्ये जातील. ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांविरुद्ध न खेळलेल्या टीममध्ये सुपर सिक्सचे सामने होतील आणि फायनलमध्ये गेलेल्या टीमना २०१९चा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळेल. २०१९ चा वर्ल्ड कप १० टीममध्ये खेळवण्यात येणार आहे.