मुंबई : भारतीय टीममध्ये निवड होण्यासाठी यो-यो टेस्ट हा सध्या महत्त्वाचा मापदंड ठरत आहे. यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे काही खेळाडूंची टीममध्ये निवड झाल्यानंतरही त्यांना डच्चू देण्यात आला. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मनिष पांडेनं यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक मार्क मिळवले होते. पण आता मयांक डागर यानं कोहली आणि मनिष पांडेचं रेकॉर्ड मोडलं आहे. यो-यो टेस्टमध्ये मयांकनं १९.३ एवढा स्कोअर केला. यो-यो टेस्ट पास करण्यासाठी १६.१ एवढ्या स्कोअरची आवश्यकता आहे.
विराट कोहली हा भारतीय टीममधला सगळ्यात तंदुरुस्त खेळाडू समजला जातो. विराट कोहलीचा यो-यो टेस्टमधला स्कोअर १९ आहे. तर मनिष पांडेनं १९.२ एवढा स्कोअर केला होता. मयांकनं मनिष पांडे आणि विराटलाही मागे टाकलं आहे. २१ वर्षांचा मयांक डागर हा विरेंद्र सेहवागचा भाचा आहे. २००६ सालच्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्येही मयांक डागर खेळला होता. मयांकनं त्याचा यो-यो टेस्टमधला स्कोअर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
यो-यो टेस्टमध्ये अंबाती रायडू, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमी नापास झाले होते. अंबाती रायडूची इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये निवड झाली होती. पण यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे त्याला संधी मिळाली नाही. शमीचीही अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्ट मॅचसाठी निवड करण्यात आली होती. पण त्यालाही या मॅचला मुकावं लागलं होतं.
संजू सॅमसन याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ टीममध्ये निवड झाली होती. पण सॅमसनही यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरला आणि त्याला या दौऱ्यातून डच्चू मिळाला.