रमेश पोवार भारतीय महिला टीमचा नवा प्रशिक्षक

भारताचा माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार याची भारतीय महिला टीमचा अंतरिम प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

Updated: Jul 16, 2018, 07:22 PM IST
रमेश पोवार भारतीय महिला टीमचा नवा प्रशिक्षक

मुंबई : भारताचा माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार याची भारतीय महिला टीमचा अंतरिम प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. जोपर्यंत बीसीसीआयला नवा प्रशिक्षक सापडत नाही तोपर्यंत रमेश पोवार महिला टीमचा प्रशिक्षक असेल. ज्येष्ठ खेळाडूंसोबत मतभेद झाल्यामुळे तुषार अरोठे यांना प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महिला खेळाडू तुषार अरोठेंच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर नाराज होत्या. २५ जुलैपासून महिला टीमचं शिबीर बंगळुरूमध्ये सुरु होत आहे. तेव्हापासून रमेश पोवार महिला टीमसोबत असेल. महिला टीमचा प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत. याची अंतिम तारीख २० जुलै आहे.

मला मिळालेल्या जबाबदारीमुळे मी खुश आहे. महिला टीमला यशस्वी करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया रमेश पोवारनं दिली आहे. ४० वर्षांच्या पोवारनं भारतासाठी २ टेस्ट आणि ३१ वनडे मॅच खेळल्या. पोवारनं वनडेमध्ये ३४ विकेट आणि टेस्ट मध्ये ६ विकेट घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पोवारनं १४८ मॅचमध्ये ४७० विकेट घेतल्या.

मुंबईच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत पोवार 

याआधी रमेश पोवार मुंबई टीमच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतही होता. पण विनायक सामंत यांची या पदावर वर्णी लागली. तांत्रिक अडचणींमुळे रमेश पोवारची निवड करता आली नाही. राजीनामा दिलेल्या व्यक्तीचा पुन्हा विचार करण्यात येऊ नये असा ठराव समितीनं पास केल्यामुळे रमेश पोवारला संधी देता आली नाही. याच वर्षी रमेश पोवार यानं एमसीए अॅकेडमीच्या स्पिन बॉलिंग प्रशिक्षकपदाचा मध्येच राजीनामा दिला होता.

रमेश पोवार ऑस्ट्रेलियात

एमसीए अॅकेडमीच्या स्पिन बॉलिंग प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर पोवार ऑस्ट्रेलियाला गेला होता. ऑस्ट्रेलियात पोवरानं युवा स्पिनर यांना प्रशिक्षण दिलं होतं. नियमांनुसार प्रशिक्षकाचं वय ५५ वर्षांपेक्षा कमी असावं आणि त्याला आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम श्रेणी टीमला प्रशिक्षण देण्याचा अनुभव असावा.

तुषार अरोठेंविरोधात हरमनप्रीतची तक्रार

तुषार अरोठे यांनी भारतीय महिला टीमला वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण भारतीय टीममधल्या वरिष्ठ खेळाडूंना अरोठेंच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर आक्षेप होता. टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या तक्रारीनंतर अरोठेंना हटवण्यात आलं. सकाळी अडीच तास आणि संध्याकाळी अडीच तासांचा सराव करण्यासाठी अरोठे आग्रही होते. पण टीममधल्या ३० वर्षांच्या वरच्या खेळाडूंना हा सराव कठीण जात होता.

तुषार अरोठे नाराज 

शिक्षक असतानाही विद्यार्थ्यांनी स्वत:च आपला अभ्यासक्रम ठरवत असतील तर ते चांगलं नाही. खेळाडूंच्या आरोपावर प्रशिक्षक हटवले जात असतील तर तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहात, असं म्हणत तुषार अरोठेंनी नाराजी जाहीर केली आहे. माझ्या आधी कुणीतरी वेगळं होतं(पूर्णीमा राव) ज्यांना हटवण्यात आलं कारण खेळाडूंना त्या आवडत नव्हत्या. त्यांना माझी पद्धत आवडत नव्हती. उद्या दुसरा प्रशिक्षक येईल. कदाचित त्याची पद्धतही यांना आवडणार नाही. ठराविक जणांनाच ही अडचण असेल तर याचा अर्थ काय होतो, असा सवाल अरोठेंनी विचारला.

मागच्या वर्षीही अशाच प्रकारे भारतीय पुरुष टीमचा प्रशिक्षक अनिल कुंबळेनं राजीनामा दिला होता. कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या मतभेदानंतर कुंबळेनं राजीनामा दिला. यानंतर रवी शास्त्री भारताचा प्रशिक्षक झाला.