close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कलम ३७० वर बोलणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० वरून गौतम गंभीरने जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. 

Updated: Apr 9, 2019, 08:33 PM IST
कलम ३७० वर बोलणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० वरून गौतम गंभीरने जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर लोकसभा निवडणुकीसाठी बंदी घालावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवरून मेहबुबा मुफ्तींनी भाजपवर निशाणा साधला. 'न्यायालयाचा वेळ फुकट का घालवता? भाजपकडून कलम ३७० रद्द होण्याची वाट बघा. कलम ३७० रद्द झाल्यानंतर आम्ही लोकसभा निवडणूक लढणार नाही. कारण मग भारताचं संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू होणार नाही. हिंदुस्तानी नागरिकांनो तुम्हाला हे कळत नसेल, तर तुम्ही नष्ट व्हाल', असं ट्विट मेहबुबा मुफ्तींना केलं होतं.

mufti

मेहबुबा मुफ्तींच्या या ट्विटवर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली होती. 'हा भारत आहे. नष्ट व्हायला तुमच्यासारखा डाग नाही,' असा रिप्लाय गौतम गंभीरने मेहबुबा मुफ्तींना दिला.

गौतम गंभीरचा हा रिप्लाय पाहून मेहबुबा मुफ्ती चांगल्याच खवळल्या. 'तुझी भाजपमधील कारकिर्द तुझ्या क्रिकेट कारकिर्दीएवढी वाईट ठरणार नाही, अशी अपेक्षा मी करते', असं ट्विट मेहबुबा मुफ्तींनी केलं.

या सगळ्या वादावादीनंतर मेहबुबा मुफ्तींनी गौतम गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केलं. 'तुमच्या मताविरुद्ध असणाऱ्या सगळ्या भारतीयांना तुम्ही ब्लॉक करणार का?' असा सवाल यानंतर गंभीरने विचारला. यानंतर मेहबुबा मुफ्तींनी गौतम गंभीरला अनब्लॉक केलं.

याआधीही गौतम गंभीरने ओमर अब्दुल्लांच्या वादग्रस्त मागणीवर निशाणा साधला होता. जम्मू-काश्मीरसाठी वेगळा राष्ट्रपती आणि वेगळा पंतप्रधान असावा, अशी मागणी ओमर अब्दुल्लांनी केली होती.