Mohammed Shami Slams Pakistani: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा गाजवली. पहिल्या 4 सामन्यांमध्ये संघात संधी न मिळालेल्या शमीने उर्वरित 7 सामन्यांमध्ये तब्बल 24 विकेट्स घेतल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये मिळवलेल्या यशामध्ये शमीच्या गोलंदाजीचा सिंहाचा वाटा आहे. यंदाच्या पर्वात शमी हा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. उत्तर प्रदेशमधील या वेगवान गोलंदाजाने 24 विकेट्स घेताना तब्बल 3 वेळा 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. सेमी फायनलच्या समान्यामध्ये शमीने न्यूझीलंडविरुद्ध तब्बल 7 विकेट्स घेतल्या. एकाच एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्स घेणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
मात्र वर्ल्ड कप 2023 दरम्यान सोशल मीडियावर एक वाद चांगलाच चर्चेत होता. श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या सामन्यामध्ये मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या. वानखेडेच्या मैदानात झालेल्या या सामन्यात पाचवी विकेट घेतल्यानंतर शमी मैदानावरच गुडघे टेकून खाली बसला. सोशल मीडियावर काही युझर्सने खास करुन पाकिस्तानी युझर्सने हा फोटो व्हायरल केला आणि त्याला धार्मिक जोड देत नको तो वाद निर्माण केला. बुधवारी शमीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केलं आहे.
"एका सामन्यामध्ये तू 5 विकेट्स घेतल्यानंतर गुडघ्यावर बसला. त्यानंतर सोशल मीडियावर खास करुन पाकिस्तानमधून अशा पोस्ट व्हायरल झाल्या ज्यामध्ये 'मोहम्मद शमी हा भारतीय मुस्लीम आहे. त्याला सजदा करायचा होता. मात्र त्याला भारतात हे करायला भीती वाटत होती,' असा दावा करण्यात आला," असं म्हणत 'आज तक'च्या मुलाखतीत मोहम्मद शामीला प्रश्न विचारण्यात आला.
"कोणाला सजदा (प्रार्थना) करायची असेल तर त्याला कोण थांबवणार? मी कोणाला त्यांच्या धर्मातील प्रथांचं पालन करण्यापासून रोखलं नाही तर कोणी मलाही रोखणार नाही. मला सजदा करायचा असेल तर मी करेन. यामध्ये अडचण असण्यासारखं काय आहे? मी अभिमानाने सांगतो की मी मुस्लीम आहे. मी भारतीय आहे. मी अभिमानाने सांगतो की मी भारतीय आहे," असं शमीने म्हटलं आहे. "मला काही अडचण असती तर मी भारतात राहिलो नसतो. मला प्रार्थना करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत असेल तर मी इथे कशाला राहीन? मी सुद्धा सोशल मीडियावर या पोस्ट पाहिल्यात. मी कधी मैदानामध्ये सजदा केला आहे का? मी यापूर्वीही 5 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र मी कधीच मैदानात सजदा केलेला नाही. मला सजदा करायचा असेल तर तो कुठे करायचा सांगा मी तो करेन," असंही शमीने म्हटलं.
काही लोक कारण नसताना वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा टोलाही शमीने लगावला. तसेच शमी गुडघ्यावर का बसला होता याचाही खुलासा त्याने केला. "मी भारतात कुठेही सजदा करु शकतो. मला कोणीही अडवणार नाही. या लोकांना उगाच संभ्रम निर्माण करायचा असतो. अशी लोक ना तुमच्यासोबत आहेत ना माझ्यासोबत. त्यांना कोणाबद्दलही प्रेम वाटत नाही. त्यांना नुसता कंटेट हवा असतो. मी माझ्या क्षमतेहून अधिक ताकदीने गोलंदाजी करत असल्याने थकलो होतो म्हणून मी खाली बसलो. लोकांनी याचा वेगळा अर्थ काढला," असं शमी म्हणाला.
मोहम्मद शमी सध्या वैद्यकीय उपचार घेत आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सहभागी होईल. हा सामना 26 डिसेंबर रोजी होणार आहे.