मुंबई : भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीने त्याच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी निवृत्तीनंतर चित्रकार होण्याचा छंद पूर्ण करणार असल्याचं सांगत आहे. 'लहानपणापासूनच मला चित्रकार व्हायचं होतं. मी भरपूर क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे आता मला जे करायचं होतं त्याच्यावर निर्णय घ्यायची वेळ आली आहे. मी काही पेंटिंग बनवली आहेत,' असं धोनी म्हणाला.
भारताला टी-२० वर्ल्ड कप आणि ५० ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकवून देणारा धोनी ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. हा वर्ल्ड कप धोनीचा शेवटचा असेल, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. धोनी हा सध्या ३७ वर्षांचा आहे, त्यामुळे पुढच्या वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
धोनीने तीन पेंटिंग बनवली आहेत. यातलं एक पेंटिग निसर्गाचं दृष्यं दाखवत आहे. दुसरं पेंटिंग हे भविष्यातलं परिवहनाचं साधन असू शकतं, असं धोनीने सांगितलं. तर तिसरं पेंटिंग हे आपलं सगळ्यात आवडतं असल्याचं धोनीने सांगितलं. या पेंटिगमध्ये धोनी आयपीएलच्या चेन्नई टीमच्या जर्सीत खेळताना दिसत आहे. आपल्या चित्रांचं प्रदर्शन लवकरच भरवणार असल्याचं धोनी म्हणाला. यासाठी धोनीने त्याच्या चाहत्यांकडून सूचना आणि सल्लेही मागवले आहेत.