मुंबई : मे महिन्यापासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी प्रत्येक टीम जोरदार तयारी करत आहे. या वर्ल्ड कपमध्ये धोनी भारतीय टीममधील महत्वाचा खेळाडू असणार आहे, असे भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले. ते क्रिकएन्फो या वेबसाईटसोबत बोलत होते.
प्रसाद यांनी धोनीच्या खेळाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्याची सांगता झाली आहे. या दौऱ्यांमधल्या वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये भारताचा विजय झाला. ऑस्ट्रेलियात भारतानं टेस्ट सीरिज २-१, वनडे सीरिज २-१ आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सीरिज ४-१नं जिंकली. या दोन्ही दौऱ्यात धोनीची वनडे सीरिजमधली कामगिरी ही उत्तम होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वनडे सीरिजमध्ये धोनीने १९३ रन केल्या. सीरिजच्या तिन्ही मॅचमध्ये धोनीनं अर्धशतकं केली. यासाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
'धोनीचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमधील कामगिरी पाहता धोनीचा चांगल्याच जोमात आहे. धोनीने त्याच्या स्वत:च्या शैलीने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीनं याआधी केलेल्या तडाखेबाज खेळीची पुनरावृत्ती केल्यास ते भारतीय टीमसाठी अनुकुल ठरेल.' असे प्रसाद म्हणाले.
'या वर्ल्ड कपसाठी धोनी सर्वात महत्वाचा खेळाडू असणार आहे. धोनीकडे कर्णधार पदाचा दीर्घ अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वातच भारताने टी-२०, वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा हा कर्णधार कोहली आणि पर्यायाने भारतीय टीमला होणार आहे. तसेच धोनी विकेट च्या मागे खूप चांगली कामगिरी करत आहे. तो बॉलरना मार्गदर्शन करत असतो. धोनीने दिलेला सल्ला कधीच फोल ठरत नाही, त्यामुळे तो टीममधील नव्या दमाच्या खेळाडूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका सुद्धा बजावणार आहे. धोनीचा एकूणच बॅटिंग, किपींग आणि त्याला असलेला एकुणच अनुभव हा टीमसाठी लाभदायक ठरणार आहे, म्हणूनच तो या वर्ल्ड कपसाठी महत्वाचा खेळाडू असणार आहे,' अशी प्रतिक्रिया प्रसाद यांनी दिली.
ऑस्ट्रेलियाची टीम ५ वनडे मॅचच्या सीरिजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर लगेचच आयपीएल सुरु होणार आहे. यामध्येही धोनी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडसारखीच कामगिरी करेल, असा विश्वास एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.