'म्हणून अश्विन-जडेजाला वनडेमध्ये संधी नाही'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 24, 2017, 09:01 PM IST
'म्हणून अश्विन-जडेजाला वनडेमध्ये संधी नाही' title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघामध्ये अश्विन आणि जडेजाला स्थान देण्यात आलेलं नाही. तर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये लागोपाठ अर्धशतकं झळकावणाऱ्या के.एल.राहुललाही डावलण्यात आलं.

अश्विन आणि जडेजाच्या ऐवजी संघामध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. या दोघांबरोबरच अक्सर पटेलचाही संघात समावेश झाला.

चहल-कुलदीपमध्ये सुधारणा

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव गेल्या काही महिन्यांपासून चांगलं प्रदर्शन करत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही त्यांना खेळवत आहोत. चहल आणि कुलदीपच्या बॉलिंगमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांना आणखी संधी देऊन त्यांची कामगिरी आम्हाला उंचवायची आहे, असं एमएसके प्रसाद म्हणाले.

भारताकडून खेळणारे पाच ते सहा सर्वोत्कृष्ट स्पिनर्स आम्हाला तयार करायचे आहेत, अशी प्रतिक्रिया एमएसके प्रसाद यांनी दिली आहे.

धोनी सर्वोत्तम, २०१९चा वर्ल्ड कप खेळणार

महेंद्रसिंग धोनी २०१९च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाचा हिस्सा असतील. ज्या युवा विकेट कीपरना आम्ही संधी दिली, त्यांचं प्रदर्शन धोनीसारखं नाही, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं आहे.

धोनी अजूनही जगातला सर्वोत्तम विकेट कीपर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये धोनीनं उत्कृष्ट स्टम्पिंग आणि कॅच पकडले. भारतातच काय पण जगभरामध्ये धोनीसारखा विकेट कीपर शोधूनही सापडणार नाही, असं एमएसके प्रसाद म्हणाले.