आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवतीय नाशिक कन्या मोनाली गोऱ्हे

क्रीडा क्षेत्रात नाशिकच्या मुलींचा दबदबा आहे....नेमबाजीमध्ये  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकं मिळवणाऱ्या खेळाडूंना नाशिकचीच एक तरुणी प्रशिक्षण देतेय... विशेष म्हणजे तिच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेतल्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केलीय.

Updated: Dec 5, 2017, 03:29 PM IST
आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवतीय नाशिक कन्या मोनाली गोऱ्हे title=

मुकुल कुलकर्णी, झी मिडिया नाशिक : क्रीडा क्षेत्रात नाशिकच्या मुलींचा दबदबा आहे....नेमबाजीमध्ये  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकं मिळवणाऱ्या खेळाडूंना नाशिकचीच एक तरुणी प्रशिक्षण देतेय... विशेष म्हणजे तिच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेतल्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केलीय.

व्यक्तिगत खेळाकडे दूर्लक्ष करून प्रशिक्षणाकडे लक्ष

मोनाली गोऱ्हे.... नेमबाजीच्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी तिच्या नावावर आहे.....  क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ दिवंगत भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली मोनालीनं कारकिर्दीला सुरुवात केली..... स्वतःचा खेळ करता करता, मोनालीला नेमबाज खेळाडूसाठी  प्रशिक्षकांची कमतरता जाणवू लागली.. त्यामुळे वैयक्तिक खेळाकडे दुर्लक्ष करून नेमबाजांची फौज उभी करण्याचा निर्धार तिने केला.  एक्सएल टार्गेट शुटर्स असोसिएशनची  स्थापना करून नाशिकच्या मातीतून नेमबाजीतले अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले.

विश्वचषक स्पर्धेत मोलाची कामगिरी

 या नेमबाजांच्या अचूक वेधामुळे मोनालीला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा बहुमान मिळाला. तिच्या नेतृत्वखाली भारतीय संघाने नुकतीच राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलीय.  त्याआधी २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही मोनालीनं प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळलीय. श्रीलंकेच्या नेमबाजानांनाही मोनालीनं प्रशिक्षण दिलंय. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही श्रीलंकेच्या खेळाडूंनीही दमदार कामगिरी केलीय.

प्रशिक्षणाला हवी आर्थिक पाटबळाची जोड

 

नाशिक शहरातून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतायत. पण त्यांना काही अडचणींचाही सामना करावा लागतोय.  गेल्या वर्षभरापासून शुटींग रेंजचं काम रखडलंय. बहुतांश खेळाडू मध्यवर्गीय घरातले आहेत. त्यांच्यात जिद्द आहे मात्र पुरेसं आर्थिक पाठबळ मिळत नाहीय. त्यासाठीच सीएसआर फंडातून मदत मिळावी, असी अपेक्षा व्यक्त होतेय.  

खेळाडूंची नगरी ठरू पाहतेय नाशिक...

मंदिरांची नगरी, औद्योगिक नगरी आणि वाईन नगरी याच्याबरोबरच खेळाडूंची नगरी अशी नवी ओळख नाशिकची तयार होतेय. ज्या शहरानं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण करणारे धावपटू दिले, त्याच शहरात मोनालीच्या मार्गदर्शनाखाली आता नेमबाजांचा सराव सुरू आहे. त्यांचं लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेधाचं आहे.... मोनालीसह या सगळ्या नेमबाजांना शुभेच्छा....