ODI World Cup 2023 : भारतात पाच ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार. या स्पर्धेची भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण यातही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यावर. 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार हा सामना 15 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार होता. पण आयसीसीने भारत-पाक सामन्यासह नऊ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. नव्या वेळापत्रकनुसार भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाईल.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्याची इच्छा प्रत्येक क्रिकेट प्रेमीला असते. त्यामुळे पाहिजे त्या किंमतीत तिकिट घेऊन चाहते भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावतात. पण एकदिवीस विश्वचषक सामन्यातील भारत-पाकिस्तानला सामना पाहण्याचा तुम्ही विचार करत असाल तर जरा थांबा. अहमदाबादमध्ये (Ahmadabad) हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार अहमदाबादेत ज्या हॉटेलमध्ये एकादिवसाची किंमत 4 हजार रुपये होती. त्या हॉटेलमध्ये एका रुमची एकादिवसाची किंमत तब्बल 60 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजेच अहमदाबादमध्ये हॉटेलच्या किंमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तर हॉटेल्सने किमतीत अव्वाच्या सव्वा वाढवल्या आहेत. महागड्या हॉटेल्सच्या किंमतीत तर लाखाच्या घरात आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेलबरोबरच इतर वस्तूंच्या किंमतीही वाढवण्यात आल्याची माहिती आहे. पण यानंतरही क्रिकेटप्रेमींचा उत्साह जराही कमी झालेला नाही. अहमदाबादमधील सर्व हॉटेल्सचं बुकिंग फूल झालं आहे.
विमान तिकिटातही वाढ
एकदिवसीय विश्वचषकाची तिकिटविक्री अद्याप व्हायची आहे. पण त्या आधीच हॉटेल्स बूक झाले आहेत. हॉटेलच नाही तर स्पर्धेच्या काळात अहदाबादला येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांमध्येही मोठी वाढ झाली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाईल.
एकदिवसीय विश्व चषक स्पर्धा देशातल्या दहा स्टेडिअमवर खेळवली जाणार आहे. यात हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. याशिवाय गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरुममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान सराव सामने खेळवले जातील. एकदिवसीय विश्वचषकाची तिकिटं मिळवण्यासाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. यानंतर तुम्हाला तिकिटं मिळणार आहेत. रजिस्ट्रेशनला आजपासून म्हणजे 15 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.