Rahul Dravid Blunt Take: भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी भारताचा सर्वोत्तम संघ तयार करुन कर्णधार रोहित शर्माच्या हाती सोपवला आहे. आता राहुल द्रविडने रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने उत्तम कामगिरी करुन दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासंदर्भातील विधान राहुल द्रविडने केलं आहे. "खरं सांगायचं झाल्यास, एकदा खेळ सुरु झाल्यानंतर हा संघ कर्णधाराचा असतो. संघाला हा संपूर्ण खेळ पुढे न्यावा लागतो. त्यांनाच मैदानात सर्व काही करावं लागतं. त्यांना त्यांची कामगिरी पार पाडावी लागते," असं द्रविडने प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
प्रशिक्षक या नात्याने आपली भूमिका काय आहे हे सुद्धा द्रविडने यावेळेस स्पष्ट केलं. "प्रशिक्षक म्हणून सामना सुरु होण्यापर्यंत माझी भूमिका महत्त्वाची असते. मी वर्ल्डकपर्यंत संघाला घेऊन आलो असून हवा तसा संघ निवडून आम्ही आता स्पर्धेत उतरत आहोत. संघाची आणि या एकंदरित चमुची बांधणी करणं आणि त्यानंतर खेळाडूंनी त्यांच्या स्तरावर कामगिरी करुन स्वत:ला मैदानात सिद्ध करणं हा फार रंजक प्रवास असतो," असं द्रविडने म्हटलं आहे.
"प्रशिक्षक म्हणून मला असं वाटतं की, एकदा खेळाडूंनी मैदानात उतरण्यासाठी सीमारेषा ओळांडली की प्रशिक्षक काहीच करु शकत नाही. प्रशिक्षक म्हणून आम्ही एकही धाव मैदानात काढत नाही किंवा एकही विकेट घेत नाही. आम्ही केवळ खेळाडूंना पाठिंबा देऊ शकतो," असं द्रविड म्हणाला. "संघ मैदानात उतरल्यानंतर तो प्रशिक्षकाचा नसतो. तो संघ कर्णधाराचा असतो," असंही द्रविडने म्हटलं. राहुल द्रविडने केलेलं हे विधान क्रिकेट वर्तुळातील काही चर्चांनुसार जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्यासारखं झाल्याचंही बोललं जात आहे.
या वर्ल्डकपमध्ये सामने वेगवेगळ्या मैदानांवर होणार असल्याचा मुद्दाही द्रविडने यावेळेस उपस्थित केला. "वर्ल्डकपमधील सामने वेगवेगळ्या मैदानांमध्ये खेळवले जाणार आहेत. प्रत्येक मैदानातील खेळपट्टी वेगळी आहे. काही चौकोनी आहेत. काही मैदानांमध्ये लाल माती आहे, काही ठिकाणी काळी काही ठिकाणी काळी आणि लाल मिक्स माती सापडते. त्यामुळेच प्रत्येक मैदान हे वेगळं असणार आहे. त्यामुळे सुरक्षित धावसंख्या काय असेल हे सांगणं कठीण आहे," असं द्रविडने म्हटलं आहे.
"बंगळुरु किंवा दिल्लीतील मैदानाशी तुलना केली तर आम्ही चेन्नईमधील सामना हा तुलनेनं मोठ्या मैदानात खेळू. सामन्यांची ठिकाणंही वेगवेगली असणार आहे. त्यामुळे आमच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे हे कळेलच," असंही द्रविडने म्हटलं.