मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship Final) अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) झालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबरच (Virat Kohli) मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारतीय क्रिकेट चाहत्यांनी रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून 'द वॉल' राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नावाला पसंती दिली आहे. रवी शास्त्री यांचा भारतीय संघाबरोबरचा करार यावर्षीच्या अखेरीस आयसीसी टी-20 वर्ल्ड कपनंतर (ICC T20 World Cup) संपुष्टात येणार आहे. भारतीय क्रिकेटर संघाचे माजी खेळाडू रतिंदर सिंह सोढी (Reetinder Singh Sodhi) यांच्या मते राहुल द्रविड या पदासाठी प्रमुख दावेदार असू शकतात.
रतिंदर सिंह सोढी यांनी एका मुलाखतीत मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचं भारतीय संघासाठी मोलांच योगदान असल्याचं म्हटलं आहे. पण राहुल द्रविड सध्या मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय युवा संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहेत. यावरुनच स्पष्ट होतं की राहुल द्रविड यांचं नाव रवी शास्त्री यांच्यानंतर आघाडीवर आहे.
राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली 19 वर्षाखालील भारतीय संघाने 2018 मध्ये जेतेपद पटकालं होतं. याबरोबरच युवा संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे युवा क्रिकेटपटूंसाठी राहुल द्रविड रोल मॉडेल मानले जातात.