मी असतो तर जिंकलो असतो...; इंग्लंडविरूद्धच्या टेस्टबाबत Ravi Shastri यांचं वक्तव्य

टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाला असून ते सध्या टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही

Updated: Aug 24, 2022, 07:57 AM IST
मी असतो तर जिंकलो असतो...; इंग्लंडविरूद्धच्या टेस्टबाबत Ravi Shastri यांचं वक्तव्य title=

मुंबई : आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे आणि त्याआधीही टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाला असून ते सध्या टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही. याच दरम्यान आता माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राहुल द्रविड लवकरच कोरोना निगेटिव्ह होऊन टीम इंडियात सामील होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले की, मला वाटत नाही की यामुळे काही फारसा फरक पडेल. याला कोरोना म्हणू नका, कारण हा फ्लू आहे आणि तीन-चार दिवसांत सर्व काही ठीक होईल आणि राहुल पुन्हा मैदानात उतरेल.

आशिया कपपूर्वी झालेल्या संभाषणात रवी शास्त्री यांनी काही काळ इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सिरीजतील पाचव्या कसोटी सामन्याबद्दलही वक्तव्य केलं. रवी शास्त्री म्हणाले, की जर टीम इंडियाने हा सामना 2021 मध्येच खेळला असता तर भारत जिंकला असता.

गेल्या वर्षी झालेल्या टेस्ट सिरीजच्या चौथ्या सामन्यादरम्यान कोरोनाची प्रकरणं समोर आली होती. यावेळी रवी शास्त्री यांनाही कोरोना झाला होता आणि त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि पाचवी टेस्ट रद्द करण्यात आली होती. ही टेस्ट याच वर्षी खेळली गेली आणि त्यात भारताचा पराभव झाला, इंग्लंडने सिरीज 2-2 अशी बरोबरीत सोडवली.

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, मी देखील 6-7 दिवसांत ड्रेसिंग रूममध्ये परत येऊ शकलो असतो आणि जर मी ड्रेसिंग रूममध्ये असतो तर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धचा ती टेस्ट नक्की जिंकू शकली असती. 

आशिया कप 2022 शनिवारपासून म्हणजेच 27 ऑगस्टपासून सुरू होतोय. 28 ऑगस्टला टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. यापूर्वी राहुल द्रविडचे कोविड पॉझिटिव्ह असणं ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. राहुल द्रविड तंदुरुस्त नसल्यास व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाला प्रशिक्षक म्हणून सामील होऊ शकतो.