किंगस्टन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या टेस्टमध्ये संधी मिळाली तर आर. अश्विन श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी करु शकेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अश्विनला टीममध्ये जागा मिळाली नव्हती. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१८ रननी विजय झाला होता. या मॅचमध्ये भारताने रवींद्र जडेजाला संधी दिली होती. जडेजाने पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं आणि दोन विकेट घेतल्या.
दुसऱ्या टेस्टमध्येही जडेजा टीमची पहिली पसंत असेल, पण जर खेळपट्टी सुकी असेल तर भारत २ स्पिनरसह खेळू शकते. अश्विनने ६५ टेस्टमध्ये ३४२ विकेट घेतल्या आहेत आणि २,३६१ रन केले आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये अश्विनने ८ विकेट घेतल्या तर तो मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी करेल. मुरलीधरनने ६६ टेस्टमध्ये ३५० विकेट घेतल्या आहेत.
अश्विनची वेस्ट इंडिजविरुद्धची कामगिरी उत्कृष्ट आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ११ टेस्टमध्ये त्याने २१.८५ च्या सरासरीने ६० विकेट घेतल्या. याचबरोबर अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध ४ शतकंही केली आहेत. अश्विनने मागची टेस्ट डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. यानंतर दुखापतीमुळे तो टीमबाहेर होता. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची निवड झाली असली तरी त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी अश्विनची निवड न झाल्यामुळे टीका केली होती.