India vs Shri Lanka Test : भारत आणि श्रीलंकादरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) हा सामना गाजवला असतानाच भारताचा दिग्गज बॉलर रविचंद्रन अश्विनसाठी (Ravichandran Ashwin) देखील हा सामना खास ठरला आहे.
अश्विन भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने विश्वविजेता कर्णधार आणि भारताचा माजी वेगावन गोलंदाज कपिल देवचा (Kapil Dev) विक्रम मागे टाकला आहे.
अश्विनच्या नावावर मोठा विक्रम
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात चरिथ असलंकाची विकेट घेत अश्विनने कपिल देवचा विक्रम मोडला. अश्विनने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये 435 विकेट घेतल्या आहेत. भारताचा महान गोलंदाज अनिल कुंबळे अश्विनच्या पुढे आहे, कुंबळेच्या नावावर 619 कसोटी विकेट आहेत.
या दिग्गज बॉलर्सनाही टाकलं मागे
कपिलचा विक्रम मोडण्यासोबतच अश्विनने शॉन पोलॉक (421 विकेट), रिचर्ड हॅडली (431) आणि रंगना हेराथ (433) यांनाही मागे टाकलं आहे. अश्विनने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमचा 414 कसोटी बळींचा विक्रमही मोडीत काढला होता.
केवळ 85 कसोटीत विक्रमाला गवसणी
रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) 85 कसोटी सामन्यांमध्ये 435 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. हरभजन सिंगने (Harbhajan Singh) 103 कसोटी सामन्यात 417 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 30 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याची किमया केली आहे. याशिवाय त्याने 7 वेळा कसोटीत 10 विकेट घेण्याचा करिष्मा केला आहे. अश्विन आगामी काळात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनू शकतो.
कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
1. मुथय्या मुरलीधरन - 800 विकेट (श्रीलंका)
2. शेन वॉर्न- 708 विकेट (ऑस्ट्रेलिया)
3. जेम्स एंडरसन - 640 विकेट (इंग्लंड)
4. अनिल कुंबळे - 619 विकेट (भारत)
5. ग्लेन मेक्ग्रा- 563 विकेट (ऑस्ट्रेलिया)
6. स्टुअर्ट ब्रॉड- 537 विकेट (इंग्लंड)
7. कर्टनी वॉल्श- 519 विकेट (वेस्टइंडीज)
8. डेल स्टेन- 439 विकेट (दक्षिण आफ्रीका)
9. रविचंद्रन अश्विन - 435 विकेट (भारत)
10. कपिल देव - 434 विकेट (भारत)
11. रंगना हेराथ - 433 विकेट (श्रीलंका)
12. रिचर्ड हेडली- 431 विकेट (न्यूजीलँड)
13. शॉन पोलॉक- 421 विकेट (दक्षिण अफ्रीका)
14. हरभजन सिंह- 417 विकेट (भारत)
15. वसीम अक्रम- 414 विकेट (पाकिस्तान)