Rishabh Pant Post On Neeraj Chopra: भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदाची आशा असणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या नीरज चोप्राने पात्रता फेरीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे ही आशा अधिक पल्लवीत झाली आहे. भारताच्या या भालाफेकपटूने 89.34 मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन कांस्यपदकं जिंकली आहेत. आता भारताला नीरज चोप्रा, विनेश फोगाट आणि मिराबाई चानू या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे. यापैकी नीरज आणि विनेश यांच्याकडून पदक निश्चित असल्याचं मानलं जात आहे. नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर त्याचा हा मुख्य सामना 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. पण त्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने नीरज पात्र ठरल्यानंतर केलेल्या एका पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ऋषभ पंतच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक विचित्र पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये नीरज चोप्राचा उल्लेख आहे. नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं तर तो कोणत्याही एका व्यक्तीला 1 लाख 89 हजार रुपये देणार आहे. जे लोक त्याची पोस्ट लाइक करतील आणि त्यावर कमेंट करतील त्यांचाच विचार लकी विनर निवडताना केला जाईल असंही म्हटलं आहे. तसेच टॉप 10 लोकांना विमानाचं तिकीटही दिलं जाईल असा दावा करण्यात आला आहे. अनेक चाहत्यांनी ऋषभच्या अकाऊंटवरील ही पोस्ट वाचून त्याचं अकाऊंट हॅक झालं आहे की काय अशी शंका उपस्थित केली आहे. पंतकडून कधीच अशापद्धतीची पोस्ट केली जात नसल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
"उद्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले तर जो हे ट्विट लाईक करेल आणि त्यावर कमेंट असेल अशा लोकांपैकी एका नशीबवान व्यक्तीला मी 100089 रुपये देईन. तसेच या पोस्टवरुन लक्ष वेधून घेणाऱ्यांपैकी 10 लोकांना विमानाची तिकिटे मिळतील. भारताला आणि माझ्या भावाला पाठिंबा देऊयात," अशी पोस्ट पंतने केली आहे.
नक्की वाचा >> तासाचे 2 कोटी रुपये देतो, फक्त..; गुप्तांगामुळे ऑलिम्पिकबाहेर पडलेल्याला 'तसल्या' कंपनीची जॉब ऑफर
सध्या तरी भारताकडून मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक कांस्यपदक जिंकलं आहे. तसेच त्यानंतर मिश्र 10 मीटर एअर पिस्तूलमध्येही मनूने सरबज्योत सिंगच्या जोडीनेही कांस्यपदक जिंकलं. त्याप्रमाणे स्वप्नील कुसळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. भारतीय हॉकी संघ मंगळवारी जर्मनीविरुद्ध 3.2 ने पराभूत झाल्याने ते आता कांस्यपदकासाठी खेळणार आहेत.