मुंबई : बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार अनेकवेळा आपल्या मनात आल्याची धक्कादायक माहिती टीम इंडियाच्या खेळाडूने दिली आहे. २००९ ते २०११ या कालावधीमध्ये मी नैराश्याचा सामना करत होतो, त्यावेळी माझ्यावर बराच मानसिक ताण होता, अशी प्रतिक्रिया रॉबिन उथप्पाने दिली आहे. उथप्पा २००७ साली टी-२० वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा भाग होता. २००६ साली उथप्पाने इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. उथप्पाने भारताकडून ४६ वनडे आणि १३ टी-२० मॅच खेळल्या आहेत.
उथप्पा राजस्थान रॉयल्स फाऊंडेशनद्वारा एनएस वाहिया फाऊंडेशन एण्ड मॅक्लिन हॉस्पिटलच्या सहयोगाने मानसिक स्वास्थ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार 'माईंड, बॉडी एण्ड सोल'मध्ये सहभागी झाला होता.
'२००६ साली पदार्पण केलं तेव्हा स्वत:बद्दल मला इतकी माहिती नव्हती. त्यावेळी मी बऱ्याच गोष्टी शिकत होतो आणि चुका दुरूस्त करत होतो. आता मी स्वत:बद्दल भरपूर माहिती ठेवतो. आता मी माझ्या विचारांबाबत पक्का आहे. घसरलो, तर स्वत:ला सांभाळणं, आता माझ्यासाठी आणखी सोपं आहे,' असं उथप्पा म्हणाला.
'खूप कठीण काळाचा सामना केल्यामुळे मी आज इकडे पोहोचलो आहे. मी खूप तणावामध्ये होतो, त्यामुळे आत्महत्येचा विचारही करायचो. २००९ ते २०११ या कालावधीत माझ्या मनात सारखे असे विचार यायचे. एक वेळ अशीही होती जेव्हा मी क्रिकेटबाबत विचारही करायचो नाही. क्रिकेट माझ्या डोक्यातून लांब फेकलं गेलं होतं. आज मी कसा वाचीन आणि दुसऱ्या दिवशी कसा जीवंत राहिन. माझ्या आयुष्यात काय होतंय आणि मी कोणत्या रस्त्याने जात आहे, एवढेच विचार माझ्या मनात यायचे,' असं उथप्पाने सांगितलं.
'क्रिकेट खेळत असतना असे विचार यायचे नाहीत, पण जेव्हा मॅच नसायची किंवा क्रिकेटचा मोसम नसायचा तेव्हा जास्त कठीण जायचं. तेव्हा ३ पर्यंत आकडे म्हणून बाल्कनीतून उडी मारायचं डोक्यात यायचं, पण कोणतीतरी गोष्ट ते करण्यापासून मला रोखायची,' असं उथप्पा म्हणाला.