रोहितचा 'डबल धमाका'; विजयासाठी भारताला ९ विकेटची गरज

रोहित शर्माने दोन्ही इनिंगमध्ये केलेल्या शतकांच्या जोरावर पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

Updated: Oct 5, 2019, 06:01 PM IST
रोहितचा 'डबल धमाका'; विजयासाठी भारताला ९ विकेटची गरज title=

विशाखापट्टणम : रोहित शर्माने दोन्ही इनिंगमध्ये केलेल्या शतकांच्या जोरावर पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी ९ विकेटची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ११/१ असा झाला होता. रवींद्र जडेजाने पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या डीन एल्गारला माघारी धाडलं आहे. पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आणखी ३८४ रनची गरज आहे.

चौथ्या दिवसाची सुरुवात ३८५/८ अशी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव ४३१ रनवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला ७१ रनची आघाडी मिळाली. आर. अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या ७ विकेट घेतल्या, तर जडेजाला २ आणि इशांत शर्माला १ विकेट मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये भारताने ५०२/७ वर डाव घोषित केला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने ३२३/४ वर डाव घोषित केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३९५ रनचं आव्हान मिळालं.

पहिल्या इनिंगमध्ये १७६ रन करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या इनिंगमध्ये १२७ रनची खेळी केली. तर पुजारा ८१ रन करुन आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये द्विशतक करणाऱ्या मयंक अग्रवालला या इनिंगमध्ये मोठी खेळी करता आली नाही. मयंक अग्रवाल ७ रन करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजानं ४० रन केले. तर विराट कोहली ३१ रनवर नाबाद आणि अजिंक्य रहाणे २७ रनवर नाबाद राहिला.