Rohit Sharma likely to retire from T20Is : आयपीएलनंतर क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला पुढच्या महिन्यात सुरूवात होत आहे. त्यासाठी आता टीम इंडिया देखील जाहीर झालीये. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल. तर 14 इतर खेळाडूंवर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलंय. अशातच आता मीडिया रिपोर्टनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित शर्मा यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेऊ शकतो, अशी माहिती दैनिक जागरणच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिकचं टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन का झालं? यावर देखील खळबळजनक माहिती समोर आलीये.
दैनिक जागरणने केलेल्या अहवालानुसार, रोहित सर्वात लहान फॉरमॅटचा म्हणजे टी-ट्वेंटी क्रिकेटचा निरोप घेऊ शकतो. रोहितच्या या निर्णयाचा थेट संबंध हार्दिक पांड्याच्या भारताच्या टी-20 विश्वचषक संघातील निवडीशी आहे. बीसीसीआय हार्दिक पांड्याकडे भारताचा भावी टी-ट्वेंटी कॅप्टन म्हणून पाहत आहे, ज्याने सिलेक्टर्सला न केवळ संघात घेण्यासाठी प्रवृत्त केलं तर, टी-20 विश्वचषकासाठी उपकर्णधारही नियुक्त करा, असा दबाव देखील आणण्यात आला होता. समोर आलेल्या या अहवालामुळे आता क्रिडाविश्वास चर्चेला उधाण आलं आहे.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून आयात केलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिक पांड्याच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आली नाही. आयपीएलमधून बाहेर पडणारी पहिली टीम म्हणून मुंबईचं नाव लिहिलं गेलं. मुंबईच्या खराब कॅप्टन्सीनंतर देखील हार्दिक पांड्याला टीम इंडियामध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्त केल्याने अनेकांनी टीका केली होती.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.