मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्रीनंही अर्ज भरला आहे. विराट कोहलीबरोबर असलेल्या चांगल्या मैत्रीमुळे रवी शास्त्रीनं प्रशिक्षकपदासाठीचा अर्ज भरल्याचं बोललं जात होतं. पण सचिन तेंडुलकरच्या सांगण्यामुळे रवी शास्त्रीनं अर्ज भरल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
मागच्या वर्षी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती न झाल्यामुळे रवी शास्त्री नाराज झाला होता. त्यामुळे त्यानं यंदा अर्ज न करण्याचा निर्णय घेतला होता. सचिन तेंडुलकरनं मात्र शास्त्रीला या निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितलं.
भारतीय टीमच्या प्रशिक्षकाची नियुक्ती सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांची समिती करणार आहे. प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे रवी शास्त्रीबरोबरच वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, डोडा गणेश, टॉम मूडी आणि रिचर्ड पायबस यांनी अर्ज केले आहेत.
मागच्या वेळीही रवी शास्त्रीनं प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, पण सचिन, सौरव आणि लक्ष्मणच्या समितीनं कुंबळेची नियुक्ती केली. तेव्हाही सचिन तेंडुलकरला शास्त्री प्रशिक्षक म्हणून हवा होता अशा चर्चा होत्या. मागच्या वेळी रवी शास्त्रीची मुलाखत सचिन आणि लक्ष्मणनं घेतली होती. या मुलाखतीला सौरव गांगुली उपस्थित नव्हता.
प्रशिक्षक म्हणून नियुक्ती न झाल्यामुळे भडकलेल्या रवी शास्त्रीनं सौरव गांगुलीवर आरोप केले होते. माझी मुलाखत घेण्यासाठी सौरव गांगुली उपस्थितच नसल्याचं शास्त्री म्हणाला होता.