इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी विकेट कीपर कोण?

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधली शेवटची आणि निर्णायक वनडे मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. 

Updated: Jul 16, 2018, 08:37 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी विकेट कीपर कोण?

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधली शेवटची आणि निर्णायक वनडे मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. वनडे सीरिजनंतर या दोन्ही टीम ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत. भारतीय ए टीम आणि इंग्लंड लायन्स यांच्यामधल्या ४ दिवसांच्या प्रथम श्रेणी मॅचदरम्यान किंवा मॅचनंतर भारतीय टेस्ट टीमची घोषणा होऊ शकते. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंडमधल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. पण विकेट कीपर म्हणून कोणाला संधी द्यायची हा प्रश्न निवड समिती, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीसमोर आहे.

ऋद्धीमान सहाला दुखापत

ऋद्धीमान सहा अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून अजूनही पुर्णपणे सावरलेला नाही. आयपीएलदरम्यान सहाला ही दुखापत झाली होती. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्ट मॅचलाही सहाला मुकावं लागलं होतं. सहाऐवजी दिनेश कार्तिकला टीममध्ये संधी देण्यात आली होती. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठीही कार्तिकची टीममधली निवड निश्चित मानली जात आहे. पण सहा पूर्णपणे फिट झाला नाही तर पार्थिव पटेल किंवा ऋषभ पंतला संधी मिळू शकते. इंग्लंडचा दौरा मोठा असल्यामुळे टीममध्ये दोन विकेट कीपर असतील हे मात्र निश्चित आहे.