Shubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर 'विराट' Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह

India vs New Zealand : युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने न्यूझीलंडविरुद्ध शतकी 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने टीम इंडियाला स्वबळावर जिंकून दिले. किवी संघाविरुद्ध शतक झळकावताच गिलने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2023, 09:44 AM IST
Shubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर 'विराट' Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह   title=

Shubman Gill Record : टीम इंडियाने तिसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या T20 सामन्यात युवा खेळाडू शुभमन गिल याने (Shubman Gill) अप्रतिम खेळ दाखवताना तुफानी शतक ठोकले. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले. गिलने शतक झळकावताच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली या दिग्गज फलंदाजाला मागे टाकले.  

Shubman Gill याचे तुफानी शतक 

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात शुभमन गिलने 63 चेंडूत 126 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्यामुळेच टीम इंडियाला 234 धावांचा डोंगर उभा करता आला. 

Shubman Gill दिग्गजांच्या यादीत  

तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल हा भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळले आहेत. गिल याने बांग्लादेशविरुद्ध कसोटी शतक, श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय शतक आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-२० शतक झळकावले आहे. 

Shubman Gill सातवा भारतीय फलंदाज ठरला 

T20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल टीम इंडियाचा सातवा फलंदाज ठरला आहे. गिलच्या आधी भारतासाठी T20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दीपक हुडा, सुरेश रैना यांचा समावेश आहे. रोहितच्या नावावर T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आहेत. त्याने चार शतके झळकावली आहेत. 

विराट कोहलीला टाकले मागे

शुभमन गिल याने न्यूझीलंडविरुद्ध 126 धावांची खेळी खेळताना आघाडीचा खेळाडू विराट कोहली याला मागे टाकले आहे. गिल आता T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आशिया कप 2022 मध्ये विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 122 धावांची इनिंग खेळली होती. आता शुबमन गिल T20 क्रिकेटमधला नवा बादशाह बनला आहे.