सिद्धूंचा सल्ला, भारत-पाकिस्तानच्या या टीममध्ये घ्या क्रिकेट मॅच

भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू नुकतेच इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानमध्ये जाऊन आले.

Updated: Aug 22, 2018, 05:55 PM IST
सिद्धूंचा सल्ला, भारत-पाकिस्तानच्या या टीममध्ये घ्या क्रिकेट मॅच title=

नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू नुकतेच इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानमध्ये जाऊन आले. पाकिस्तानमधून परत आल्यानंतर सिद्धू यांनी भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही तर आयपीएल आणि पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) यांच्यामध्ये तीन मॅचची सीरिज खेळवण्यात यावी, असा सल्ला सिद्धूंनी पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआय) पक्षाचे खासदार फैसल जावेद यांना दिला.

इस्लामाबादमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर आणि लाहोरला जाण्याआधी सिद्धू म्हणाले, ''क्रिकेट भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणू शकतो. आयपीएल आणि पीएसएलच्या विजयी टीममध्ये क्रिकेट मॅच खेळवण्यात यावी''

पीएसएल जिंकणारी इस्लामाबाद युनायटेडचे प्रशिक्षक डीएस जोन्स यांनी सिद्धूंच्या मागणीचं समर्थन केलं आहे. तसंच आमची टीम यासाठी तयार असल्याचं जोन्स म्हणाले. यावर्षी इस्लामाबाद युनायटेडनं पीएसएलची फायनल जिंकली.

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी नवजोत सिंग सिद्धू यांना आमंत्रण देण्यात आलं. पंजाबमध्ये काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या सिद्धूंनी हे आमंत्रण स्वीकारलं आणि ते वाघा बॉर्डरवरून लाहोरला पोहोचले. लाहोरवरून सिद्धू इस्लामाबादला इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी गेले.

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सिद्धूंना पुढच्या रांगेत पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला बसवण्यात आलं. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तिथल्या राष्ट्रपती पदाला किंवा पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही पदाचा भारत स्वीकार करत नाही.

सिद्धूंनी पाकिस्तान सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती. यावरूनही भाजपनं सिद्धूंवर आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही सिद्धूंच्या या गळाभेटीवर नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे भारताचे जवान सीमेवर शहीद होत असताना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाची गळाभेट घेणं चुकीचं असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते.