श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा, सीरिजही गमावली

रंगना हेराथनं घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर श्रीलंकेनं दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला.

Updated: Jul 23, 2018, 07:11 PM IST
श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा, सीरिजही गमावली title=

कोलंबो : रंगना हेराथनं घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर श्रीलंकेनं दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. याचबरोबर २ टेस्ट मॅचची ही सीरिज लंकेनं २-०नं जिंकली. २००६ नंतर श्रीलंकेनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलीच सीरिज जिंकली आहे. जिंकण्यासाठी ४९० रनचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम २९० रनवर ऑल आऊट झाली. श्रीलंकेनं १२ वर्षांपुर्वी दक्षिण आफ्रिकेचा २-०नं पराभव केला होता. आफ्रिकेनं आजच्या दिवसाची सुरुवात ५ विकेट गमावून १३९ रनवर केली होती. टी डे ब्रुईन आणि तेम्बा बऊमानं सावध बॅचिंग केली. पण हेराथनं बऊमाला ६३ रनवर आऊट केलं. हेराथनं लंचच्या आधी क्विंटन डीकॉकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

लंचनंतर बॅटिंगला आलेल्या ब्रुईननं त्याचं पहिलं शतक झळकावलं. या सीरिजमधलं दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समनचं हे पहिलं शतक आहे. हेराथनं ब्रुईनला १०१ रनवर आऊट केलं. श्रीलंकेनं पहिल्या इनिंगमध्ये ३३८ तर आफ्रिकेनं १२४ रन केले होते. पहिल्या इनिंगमध्ये अकिला धनंजयानं ५ विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेनं २७५ रनवर दुसरी इनिंग घोषित केली होती. गॉल मैदानात झालेली पहिली टेस्ट श्रीलंकेनं तीन दिवसांमध्ये जिंकली होती. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये ७३ रनवर ऑल आऊट झाली. आफ्रिकेचा टेस्ट क्रिकेटमधला हा सगळ्यात कमी स्कोअर होता.

रंगना हेराथचा विक्रम

दुसऱ्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये रंगना हेराथनं ६ विकेट घेतल्या. चौथ्या इनिंगमध्ये ५ पेक्षा जास्त विकेट सर्वाधिक वेळा घेण्याचा विक्रम रंगना हेराथच्या नावावर आहे. हेराथनं १२ वेळा चौथ्या इनिंगमध्ये ५ पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. मुरलीधरननं ७ वेळा, शेन वॉर्ननं ७ वेळा आणि रवीचंद्रन अश्विननं ६ वेळा शेवटच्या इनिंगमध्ये ५ पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.