Bangladesh vs Sri lanka : बांगलादेश आणि श्रीलंका (SL vs BAN) यांच्यात 6 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरूण जेठली क्रिकेट स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा (World cup 2023) 38 वा सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या दोन्ही संघांमध्ये सामना होणार का नाही? असा सवाल विचारला जात आहे. त्याला कारण दिल्लीतील प्रदुषण. दिल्लीच्या प्रदुषणाने (Air pollution in delhi) सर्वांच्या नाकात दम केला आहे. अशातच आता प्रदुषणामुळे सामना रद्द करण्याची वेळ देखील येऊ शकते. त्यामुळे आता बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकन संघाने देखील मोठा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ खराब हवेमुळे सराव करू शकलेले नाहीत. विषारी धुक्यामुळे बांगलादेशने शुक्रवारी आपलं प्रॅक्टिस सेशल रद्द केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील प्रॅक्टिस सेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वायुप्रदूषणाची धोकादायक पातळी ही राजधानीत सतत सुरू असलेली समस्या आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकांमध्ये श्वसनाच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. अशातच आता परदेशी खेळाडूंना देखील त्रास सहन करावा लागतोय.
आमचं या प्रकरणावर लक्ष आहे. आम्ही सध्या परिस्थितीचे आकलन करत आहोत. आयसीसी आणि आमचे यजमान बीसीसीआयचं प्राधान्य सर्व संघांना सुरक्षित ठेवणं आहे. आम्ही दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवत आहोत. परिस्थितीचे आकलन करण्यासाठी आम्ही तज्ञांचा सल्ला घेत आहोत, असं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
SL vs BAN सामना रद्द होणार?
दिल्ली आणि परिसरातील वाढत्या वायू प्रदूषणामुळे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द केला जाऊ शकतो. दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक 300 ते 500 पर्यंत पोहोचला आहे, जो श्वासोच्छवासासाठी धोकादायक आहे. त्यामुळे आता सामना होणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे. एअर क्वालिटी इंडेक्स समान राहिल्यास सामना रद्द होऊ शकतो. प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की सामन्यादरम्यान खेळाडूंना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.