युवा क्रिकेटर्सची फसवणूक केल्याप्रकरणी माजी क्रिकेटरला अटक

युवा क्रिकेटर्सला ऑस्ट्रेलियात पाठवण्याचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका माजी क्रिकेटरला अटक करण्यात आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 23, 2017, 12:01 PM IST
युवा क्रिकेटर्सची फसवणूक केल्याप्रकरणी माजी क्रिकेटरला अटक title=

नवी दिल्ली : युवा क्रिकेटर्सला ऑस्ट्रेलियात पाठवण्याचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका माजी क्रिकेटरला अटक करण्यात आली आहे.

माजी क्रिकेटर सौरभ भामरी याच्यावर आरोप आहे की, त्याने युवा क्रिकेटर्सला ऑस्ट्रेलियात पाठविण्याचं आश्वासन दिलं होतं. सौरभ भामरी हा उत्तर प्रदेशातील हापुड येथील निवासी आहे. त्याने अनेक राज्यस्तरीय मॅचेसही खेळल्या आहेत. 

पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यातच सौरभला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. मात्र, तो अटकेपासून वाचला होता. पण, सोमवारी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी छापा टाकत त्याला अटक केली आहे. 

सौरभ युवा प्लेयर्सला क्लब मॅचेस खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठविण्याचं आमिष दाखवत असे. त्यासाठी तो त्यांच्याकडून पैसे घेत असे. तो प्लेयर्सला खोटा व्हिसाही द्यायचा. त्याने प्रत्येक प्लेयरकडून ५ ते २० लाख रुपये घेतले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. 

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डसोबत माझे चांगले संबंध असल्याचं भामरी सांगत असे. याप्रकरणी सध्या त्याची पोलीस चौकशी सुरु आहे. दिल्लीत राहणा-या ऋषभ त्यागी याने दिल्ली पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आलं.