मुंबई : मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक ऐतिहासिक क्रिकेट सामना खेळला गेला. हा सामना होता दोन पूर्वापार प्रतिस्पर्ध्यांमधला आणि हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते तेही आपल्या काळातले मातब्बर क्रिकेटपटू.
हा सामना होता शिवाजी पार्क जिमखाना संघ विरुद्ध दादर युनियन संघ यांच्यातला. शिवाजी पार्क जिमखाना संघाचं नेतृत्व केलं अजित वाडेकर यांनी तर, सुनिल गावसकर यांनी दादर युनियन संघाचं कर्णधारपद सांभाळलं.
८ ओव्हर्सच्या या मॅचमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना अजित वाडेकरांच्या शिवाजी पार्क जिमखाना संघानं १ विकेट गमावून ८९ रन्स केले.
जिंकण्यासाठी ९० रन्सचं टार्गेट घेऊन उतरलेल्या सुनील गावस्कर यांच्या दादर युनियन संघाला ८५ रन्सपर्यंतचं मजल मारता आली. आणि अजित वाडेकरांचा शिवाजी पार्क संघ विजयी ठरला.
या सामन्यात माधव आपटे, प्रवीण आमरे, संजय मांजरेकर, मनोज जोगळेकर, जतीन परांजपे या आणि अशा अनेक माजी क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला.
विशेष म्हणजे सामना खेळणा-या या ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा असाच होता. हा अनोखा सामना पाहण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती.