Sunil Gavaskar Team India WTC Final 2025 : भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात सर्वात मोठा हात होता, तो ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा...! हार्दिकने (Hardik Pandya) आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मोक्याच्या क्षणी विकेट मिळवल्या तर फलंदाजी देखील अखेरच्या ओव्हरमध्ये पांड्याने आपला दांडपट्टा चालवला होता. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया नव्या मिशनवर आहे. टीम इंडियासाठी आता नवं आव्हान असणार आहे, ते म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप.. याच मुद्द्यावर आता सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
गेली 5 वर्ष टेस्ट टीममधून बाहेर असलेला हार्दिक पुन्हा 2021 मध्ये एकदा फिटेनेसच्या समस्येशी झुंजत होता, त्यानंतर त्याने टेस्ट क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर देखील तो एकही कसोटी सामना खेळला नाही. अशातच हार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट खेळला तर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी फायदा होईल, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
मला वाटतं की पुढील दोन महिने हार्दिक पांड्याला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. जर त्याने एका दिवसात 10 ओव्हर गोलंदाजी केली आणि त्याच्याच शैलीत फलंदाजी केली तर भारतीय संघाला पराभूत करणं अशक्य होईल आणि अशा स्थितीत टीम इंडिया ऑस्ट्रेलियात विजय मिळवू शकते आणि नंतर WTC चे विजेतेपद देखील जिंकू शकते, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 2017 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने 11 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने एक शतक आणि 4 अर्धशतकांसह 532 धावा केल्या आणि 17 विकेट्सही घेतल्या. त्यामुळे आता हार्दिक पांड्या खरंच टीम इंडियासाठी गेमचेंजर ठरणार का? की गौतम गंभीर नवा पर्याय शोधणार? असा सवाल विचारला जात आहे.