IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाचा आज तिसरा टी-२० सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने २३ रन्सने झिम्बाव्बेच्या टीमचा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय टीमने 5 सामन्यांच्या सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. तर आता तिसऱ्या टी-२० मध्ये विजय मिळवत टीम इंडियाने आघाडी घेतलीये.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या भारतीय संघासाठी कर्णधार शुभमन गिलने 66 रन्सची अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक अवघ्या एका रनने हुकलं. गायकवाडने 49 धावांची खेळी खेळली. यशस्वी जैस्वालनेही 36 धावा केल्या ज्यामुळे टीम इंडियाला 182 रन्सपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेच्या टीमची सुरुवात या सामन्यातही खराब झालेली दिसून आली.
तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर 183 धावांचे मोठं लक्ष्य ठेवलं होते. मात्र यजमान टीमची सुरुवातच फार खराब झाली होती. यावेळी 39 रन्सच्या स्कोरअवर अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली होती. आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असलेला वेस्ली माधवेरे केवळ 1 रन काढून बाद झाला. कर्णधार सिकंदर रझा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याला चांगली सुरुवात झाली पण सामन्याची दिशा बदलू शकेल अशी खेळी त्याला खेळता आली नाही.
झिम्बाब्वेला विजयासाठी शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 73 रन्सची आवश्यकता होती. माईर्स आणि मदंडे ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, त्यामुळे हे लक्ष्य सहज गाठता येईल असं दिसत होता. मात्र 16व्या ओव्हर्समध्ये खलील अहमदने केवळ 2 रन्स दिले. त्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव निर्माण झाला.
त्यानंतर आवेश खानने देखील मोलाची कामगिरी केली. त्याने 18 व्या ओव्हरमध्ये केवळ 6 रन्स दिले.त्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला. वॉशिंग्टन सुंदरने भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या, ज्याने आपल्या 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये 3 विकेट्स घेतले. आवेश खानने 2 तर खलील अहमदने 1 विकेट घेतली.