दुबई : काश्मीरमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूने पुढाकार घेतला आहे. सुविधांपासून वंचित असलेल्या जम्मू-काश्मीरच्या मुलांसाठी सुरेश रैना पुढे आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेट विकसित करण्याची इच्छा सुरेश रैनाने व्यक्त केली आहे. १५ ऑगस्टला सुरेश रैनाने धोनीसोबतच निवृत्तीची घोषणा केली. मला जम्मू-काश्मीरमधल्या शाळा, कॉलेज आणि ग्रामीण भागात युवा प्रतिभावान खेळाडू शोधायचे आहेत. हे खेळाडू भारतीय टीममध्ये पोहोचतील, यासाठी मला मदत करायची आहे, असं रैना म्हणाला आहे.
सुरेश रैनाने आपली ही इच्छा जम्मू-काश्मीरचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस दिलबाग सिंग यांना चिट्ठी लिहून सांगितली आहे. 'मी बराच काळ भारतीय टीममध्ये होतो, याचा मला अभिमान आहे. जगात भारतीय क्रिकेटचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर बनण्याची संधी मिळाली. आता समाजासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी मला प्रेम, पाठिंबा आणि आशिर्वाद दिला, त्याची परतफेड करायची आहे,' अशी प्रतिक्रिया रैनाने दिली आहे.
'माझे पूर्वज काश्मिरी आहेत आणि मी स्वत:ला मूळाशी जोडलेला मानतो. काश्मिरी पंडित असल्यामुळे मला जम्मू-काश्मीरच्या मुलांमध्ये खिलाडूवृत्ती, क्रिकेटची भावना आणि नैतिक मूल्यांचा विकास करायचा आहे. याच कारणासाठी मी जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग आणि अनंतनागचे एसएसपी संदीप चौधरी यांना चिट्ठी लिहून प्रस्ताव दिला आहे,' असं वक्तव्य रैनाने केलं.