Video: सूर्यकुमारचा Helicopter Shot पाहिलात का? हा Six पाहून अनेकांना आठवला धोनी

Suryakumar Yadav Helicopter Shot Video: सूर्यकुमार यादवने खऱ्या अर्थाने त्याला मिस्टर 360 डिग्री का म्हणतात हे दाखवून दिलं. सूर्याच्या बॅटमधून निघालेल्या शॉटर्सने मैदानातील जवळजवळ प्रत्येक कोन्यात चेंडू धाडला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मात्र त्याने मारलेला एक शॉट पाहून अनेकांनी धोनीची आठवण झाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 9, 2023, 11:23 AM IST
Video: सूर्यकुमारचा Helicopter Shot पाहिलात का? हा Six पाहून अनेकांना आठवला धोनी title=
वेगवान गोलंदाजीवर लगावला हा खणखणीत शॉट

Suryakumar Yadav Helicopter Shot Video: भारताचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं जावं की नाही अशी परिस्थिती मागील काही सामन्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र आपल्या टीकाकारांना सूर्यकुमारने बॅटनेच उत्तर दिलं आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत भारताचा विजय सुखकर करुन दिला. सूर्याच्या फलंदाजीच्या जोरावर भारताला वेस्ट इंडीजविरुद्धचा केवळ तिसरा सामना जिंकता आला असं नाही तर मालिकेतील आव्हानही कायम राखण्यात यश आलं आहे. या सामन्यामध्ये सूर्याने लगावलेले काही शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एक षटकार पाहून तर अनेकांना माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची आठवण झाली आहे.

सूर्यानं धू-धू धुतला

भारताचा मिस्टर 360 डिग्री अशी ओळख निर्माण केलेल्या सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तुम्ही मैदानाचा कॉर्नर सांगा तिथं फटका मारुन दाखवतो अशा शैलीत सूर्यकुमार मंगळवारी खेळत होता. सूर्यकुमार यादवने तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये 44 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांसहीत 83 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवले. 83 धावांची ही खेळी कोणत्याही भारतीयाने वेस्ट इंडीजविरुद्ध केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध 2 अर्धशतकं झळकावणारा सूर्यकुमार हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. 

विकेटकीपरच्या डोक्यावरुन मारलेला स्कूप शॉट ठरला विक्रमी षटकार

सामन्यातील 10 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने 53 धावांवर खेळत असताना विकेटकिपरच्या डोक्यावरुन मागच्या बाजूला स्कूप शॉट मारला. या शॉटमधील टायमिंग इतकं उत्तम होतं की हा षटकार गेला. हा सूर्यकुमार यादवच्या टी-20 कारकिर्दीमधील 100 वा षटकार ठरला. सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार पूर्ण केले आहेत. षटकारांचं शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. तर जागतिक स्तरावर असा पराक्रम करणारा तो 13 वा खेळाडू ठरला आहे.

सूर्याचा हेलिकॉप्टर शॉट

त्यानंतर 13 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जोसेफच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने लेग साईडला उत्तुंग षटकार लगावला. सूर्याने लगावलेला हा फटका धोनीच्या प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटसारखा होता. सध्या सूर्याच्या या हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

1)

2)

सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्याही यादीत

सूर्यकुमार यादवने 83 धावांच्या जोरावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू होण्याचा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील अर्धशतकीय खेळीमुळे त्याने शिखर धवनला मागे टाकले आहे. या खेळीनंतर सूर्यकुमारने 51 सामन्यांमधील 49 डावांत 1780 धावा केल्या आहेत. भारताकडून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल हे सूर्यकुमारपेक्षा पुढे आहेत. धवनने भारतासाठी 1,759 धावा केल्यात. विराटने सर्वाधिक 4,008 धावा, रोहितने 3,853 धावा, के. एल. राहुलने 2,265 धावा भारतासाठी खेळताना केल्या आहेत. सूर्यकुमारने 1,780 धावा करत धवनला मागे टाकलं.