Suryakumar Yadav : सूर्या 'गोल्डन डक'चा शिकार! 'ही' आहेत कारणं

तिसऱ्या वनडे सामन्यात सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याला तसं करता आलं नाही. तिसऱ्या वनडेमध्ये जेव्हा सूर्या फलंदाजीसाठी उतरला त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये पहिल्या दोन सामन्यामध्ये केलेली खराब खेळी असेल.

Updated: Mar 23, 2023, 08:00 PM IST
Suryakumar Yadav : सूर्या 'गोल्डन डक'चा शिकार! 'ही' आहेत कारणं

Suryakumar Yadav India vs Australia ODI: भारतीय टीमचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव वनडे फॉर्मेटमध्ये पूर्ण फ्लॉप झालेला दिसला. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकाही सामन्यात त्याला साधा भोपळाही फोडता आला नाही. सूर्याच्या या खराब कामगिरीची सगळीकडे चर्चा होतेय. मात्र आता प्रश्न असा आहे की, गोल्डन डकच्या हॅट्रिकचा सूर्यकुमार यादव शिकार झालाच कसा?

सूर्याकुमारच्या डोक्यात खराब फॉर्म्सचा विचार

तिसऱ्या वनडे सामन्यात सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याला तसं करता आलं नाही. तिसऱ्या वनडेमध्ये जेव्हा सूर्या फलंदाजीसाठी उतरला त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये पहिल्या दोन सामन्यामध्ये केलेली खराब खेळी असेल. या दोन्ही सामन्यांमध्ये तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यामुळे अशा वेळी जर कोणता प्लेअर तिसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरतो, तेव्हा त्याच्या डोक्यात जुन्या गोष्टी सुरु असतात. 

यामध्ये आपण असं म्हणू शकतो की, जसं गोलंदाज 2 विकेट घेतल्यानंतर हॅट्रिकचा विचार करतो. मात्र फलंदाजाच्या डोक्यात या गोष्टी उलट सुरु असतात. फलंदाज हॅट्रिकपासून वाचण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी डोक्यामध्ये असे विचार सुरु असतात ज्यामुळे फलंदाज गोंधळात पडतो आणि बॉलकडे लक्ष देऊ शकत नाही.

स्वतःला सिद्ध करण्याचं प्रेशर

गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग पहिल्याच बॉलवर आऊट झाल्याने तिसऱ्या सामन्यात आपण चांगली कामगिरी केली पाहिजे, असं काहीसं प्रेशन फलंदाजावर असतं. दुसरीकडे सूर्या टी-20 फॉर्मेटमध्ये नंबर 1 फलंदाज आहे. एका फॉर्मेटमध्ये नंबर 1 फलंदाज दुसऱ्या फॉर्मेटमध्ये फ्लॉप होतो. अशावेळी फलंदाजाला टीममधून वगळलं जाण्याची, सततची टीका आणि चर्चा थांबवायची असते. याचं दडपण फलंदाजावर असतं आणि अशातच तो चूक करतो.

फलंदाजीचा क्रम बदलणं

सूर्याच्या फलंदाजीचा क्रम बदलणं हा देखील त्याच्या खराब फॉर्मचा मुद्दा असू शकतो. तिसऱ्या वनडे सामन्यात सूर्याला फलंदाजीमध्ये नंबर 4 वरून 7 नंबरवर पाठवण्यात आलं. अशावेळी फलंदाजाच्या मनात, आपल्यासोबत असं का केलं, याचा विचार असतो. 

हार्दिक पंड्याचं ते कृत्य

तिसऱ्या वनडे सामन्यात सूर्यासोबत एक घटना घडली. ज्यावेळी सूर्या फलंदाजीसाठी मैदानात उतरत होता, तेव्हा हार्दिक पंड्या क्रीजवर होता. जेव्हा सूर्याने मैदानात एन्ट्री केली, तेव्हा हार्दिक त्याच्या जवळ गेला. पंड्याने सूर्याला काहीतरी सांगितलं आणि त्यावा पीचपर्यंत घेऊन गेला. हार्दिकने सूर्याला मोटीवेट केलं असेल, मात्र अशावेळी सूर्यावर अधिकच प्रेशर आलं आणि त्याने विकेट गमावली.