दुबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज न्यूझीलंडशी अत्यंत महत्त्वाच्या सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला नाही तर तो टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ शकतो. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धोक्याची बातमी समोर आली आहे. खरं तर, या सामन्यात एक अशी व्यक्ती देखील असेल जी जवळजवळ प्रत्येक आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताच्या पराभवात उपस्थित होती.
पंच म्हणून रिचर्ड केटलब्रॉ (Richard Kettleborough) टीम इंडियासाठी खूप दुर्दैवी ठरले आहेत, विशेषत: आयसीसी ट्रॉफीच्या नॉकआउट फेरीत हे पाहायला मिळालं आहे. रिचर्ड केटलब्रॉ गेल्या काही वर्षांत भारताने खेळलेल्या जवळपास सर्वच ICC नॉकआउट फेरीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी तेथे आपली जबाबदारी पार पाडली आहे.
परंतु ते सामने भारताने गमावले आहेत. वाईट बाब म्हणजे आज न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपमधील महत्त्वाच्या सामन्यात तेच पंच म्हणून मैदानात असणार आहेत आणि ही बाब भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे.
रिचर्ड केटलब्रॉ यांनी जेव्हा अंपायरिंग केले तेव्हा भारताला अनेक मोठ्या सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये श्रीलंकेविरुद्ध 2014 टी20 वर्ल्ड कप अंतिम फेरीतील पराभव, 2015मध्ये 50 ओव्हरचा वर्ल्ड कप उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव, 2016 मध्ये टी 20 वर्ल्ड कप उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभवाचा समावेश आहे.
एवढेच नाही तर केटलब्रॉच्या अंपायरिंगमध्ये भारताला 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर 2019 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडकडून पराभूत झाली तेव्हाही केटलब्रो मैदानावरील अंपायर होते.
अलीकडेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा केटलब्रो हे तिसरे पंच होते.
परंतु काहीही असलं तरी टीम इंडियाला आज हा इतिहास बदलावाच लागणार आहे आणि न्यूझीलंडवर मत करुन ही मॅच जिंकावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण भारताने हा सामना गमावला तरी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ते जवळपास बाहेर पडतील.
पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा भारतावर पहिला विजय आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने पाकिस्तानला 152 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 152 धावांचे आव्हान 17.5 ओव्हरमध्येच पूर्ण केले.
न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे भारतासाठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पण इतिहासाची पाने पाहिली तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला न्यूझीलंडला कधीही हरवता आलेले नाही.
टीम इंडियाने न्यूझीलंडसोबत दोन सामने खेळले आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. दोन्ही संघांमधला पहिला सामना 2007 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये खेळला गेला होता, जेव्हा न्यूझीलंड संघाने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. शेवटच्या वेळी 2016 च्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडले होते, तेव्हा भारतीय संघाला 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.