T20 World Cup 2022 : 'या' दिवशी पुन्हा भिडणार भारत विरूद्ध पाकिस्तान

 T-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. 

Updated: Jan 21, 2022, 08:48 AM IST
T20 World Cup 2022 : 'या' दिवशी पुन्हा भिडणार भारत विरूद्ध पाकिस्तान title=

मुंबई : T20 वर्ल्डकप 2022 मध्ये पुन्हा एकदा महामुकाबला पहायला मिळणार आहे. पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार असून यांच्यातील मुकाबल्याची तारीख समोर आली आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर T-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक फॅन या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय.

टीम इंडिया बदला घेणार

गेल्या वेळी UAE मध्ये झालेल्या T-20 वर्ल्डकपमध्ये, पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. या पराभावाचा फटका टीम इंडियाला बसला. उपांत्य फेरीपूर्वीच भारताला वर्ल्डकपबाहेर पडावं लागलं. त्यामुळे आता यावेळी भारत पुन्हा एकदा पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी तयार आहे.

T-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध 5-1 असा विजयी विक्रम आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने पुन्हा एकदा दोन्ही देशांदरम्यान सामना पाहायला मिळणार आहे. 

2021 च्या T-20 वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या वेळी टीम इंडियाचा 10 विकेट्स राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 विकेट्स गमावत 151 धावा केल्या. हे लक्ष्य गाठताना पाकिस्तानने 10 विकेट्स राखत भारतावर दणदणीत विजय मिळवला होता.

भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

T-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही एकाच गटात आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान T-20 वर्ल्डकपचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी होणार आहेत.

T-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. तर उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि अॅडलेड ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेत.