T20 World Cup Final: डिविलियर्सचा पाठिंबा कोणाला? द. आफ्रिका की भारत? म्हणाला, 'चाहते म्हणून आम्ही..'

AB De Villiers On T20 World Cup 2024 Final India Vs South Africa: भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये ज्या परदेशी खेळाडूंबद्दल प्रचंड क्रेझ आहे त्यामध्ये ए.बी. डिविलियर्सचा आवर्जून समावेश होतो. आता दक्षिण आफ्रिकेचा आणि भारताचा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर डिव्हिलियर्स काय म्हटला आहे पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 28, 2024, 04:12 PM IST
T20 World Cup Final: डिविलियर्सचा पाठिंबा कोणाला? द. आफ्रिका की भारत? म्हणाला, 'चाहते म्हणून आम्ही..' title=
फायनलपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराचं विधान

AB De Villiers On T20 World Cup 2024 Final India Vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्सचा माजी सदस्य असलेल्या ए.बी. डिविलियर्स दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमी-फायनलमध्ये अफगाणिस्तानच्या संघाचा 9 विकेट्स राखून पराभव केला. 27 तारखेला झालेल्या पहिल्या सेमी-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली तर दुसऱ्या सेमी-फायनलमध्ये भारताने इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत फायनल गाठली. आता हे दोन्ही संघ 29 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानात एकेमकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संघ पहिल्यादाच टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेल्यानंतर डिविलियर्सने भारताचा उल्लेख करत दक्षिण आफ्रिकेला शुभेच्छा दिल्या आहेत.

डिविलियर्सने केलं संघाचं अभिनंदन

वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये तब्बल 7 वेळा सेमी-फायनल गाठल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा संघ कधीच फायनलपर्यंत पोहोचला नव्हता. 7 पैकी 6 सामन्यांमध्ये पराभूत झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चोकर्स म्हणजेच ऐनवेळी कच खाणारा संघ म्हणून ओळखला जायचा. मात्र यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी हा ठपका खोडून काढला. या विजयानंतर डिविलियर्सने आपल्या एक्स (आधीच्या ट्वीटर) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली असल्याचं म्हटलं आहे. डिविलियर्सने दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्याविरुद्ध कोणताही संघ खेळत असला तरी यंदाची टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकेल असा विश्वास व्यक्त करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. डिविलियर्सने या शुभेच्छा देताना भारताचाही उल्लेख केला आहे.

नक्की वाचा >> टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती

डिविलियर्स नेमकं काय म्हणाला?

'आपला संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. ही फारच उत्तम यश आहे. दक्षिण आफ्रिकन संघाचं अभिनंदन. आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतोय. असेच पुढे पुढे जात राहा. आपण यापूर्वी कधीच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचलो नव्हतो. त्यामुळे हा आपल्यासाठी अगदीच नवा प्रांत आहे. चाहते म्हणून आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला फायनल खेळताना पाहण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. भारत असो किंवा इंग्लंड असो तुम्ही तुमच्या पाठिशी आहोत. आम्हाला विश्वास आहे की जेतेपद जिंकण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत. तसेच डेल स्टेनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही त्याला विजय मिळवून फार स्पेशल बर्थ डे गिफ्ट द्याल, अशी अपेक्षा आहे,' असं डिविलियर्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. डिविलियर्सने हा व्हिडीओ दुसऱ्या सेमी-फायनलचा निकाल लागण्याआधी पोस्ट केला आहे. 

नक्की वाचा >> भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'

फायनल कधी?

टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान शनिवारी, 29 जून 2024 रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.

नक्की वाचा >> 'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट

यापूर्वी हे दोन्ही संघ आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत.