T20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्यावर 'लोन वुल्फ'ची नजर? ड्रोन हल्ल्याचं सावट; 'त्या' पोस्टमुळे खळबळ

T20 World Cup 2024 IND vs PAK Terror Threat: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला 34 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची चर्चा आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 30, 2024, 02:13 PM IST
T20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्यावर 'लोन वुल्फ'ची नजर? ड्रोन हल्ल्याचं सावट; 'त्या' पोस्टमुळे खळबळ title=
वर्ल्ड कपवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

T20 World Cup 2024 IND vs PAK Terror Threat: सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडे लागलं आहे. यामागील कारण म्हणजे 5 जूनपासून अमेरिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे 20 संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या स्पर्धेवर दहशतीचं सावट आहे. या स्पर्धेला इस्लामिक स्टेटने म्हणजेच आयएसआयएसने धमकी दिली आहे.

काय आहे या कार्डमध्ये?

प्रो इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीया या दहशतवादी संघटाने अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेमध्ये या स्पर्धेच्या 9 व्या पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर आयएसआयएसने दिलेल्या धमकीचं एक ग्राफिक्स कार्ड व्हायरल होत आहे. या फोटोवर मोजक्या शब्दांमध्ये मजकूर लिहिण्यात आला आहे. "तुम्ही सामन्यांची वाट पाहत आहात आणि आम्ही तुमची..." असा मजकूर या कार्डवर लिहिण्यात आला आहे. मैदानावर एक व्यक्ती पाठमोरी उभी असून तिच्या पाठीवर बंदूक दिसत आहे.

लोन वुल्फ हल्ला?

विशेष म्हणजे हा हल्ला लोन वुल्फ हल्ला असण्याची भीती या ग्राफिक्सवरुन व्यक्त केली जात आहे. लोन वुल्फ हल्ल्यामध्ये एकच व्यक्ती ठराविक ठिकणी प्रवेश करुन अंदाधुंद गोळीबार किंवा मिळेल त्या हत्याराने हल्ला करते. ग्राफिक्समध्ये एकच व्यक्ती दाखवण्यात आल्याने लोन वुल्फ हल्ल्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं सांगितलं जात आहे. या व्हायरल पोस्टमध्ये ड्रोन दाखवण्यात आल्याने ड्रोन हल्ल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

भारत-पाक सामन्याकडे इशारा?

धक्कादायक बाब म्हणजे या पोस्टवर 9 जून 2024 अशी तारीख लिहिली असून त्यावर नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचा उल्लेख आहे. 9 तारखेला याच ठिकाणी भारत आणि पाकिस्तानविरुद्धचा हाय व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. स्टेडियमच्या वर एक ड्रोन उडताना दाखवण्यात आला आहे. या मैदानावर वर्ल्ड कपचे एकूण 8 सामने खेळवण्यात येणार आहे. हे मैदान नव्याने बांधण्यात आलं असून या मैदानाची प्रेक्षक क्षमता 34 हजार इतकी आहे. 

प्रशासन आणि पोलिसांचं म्हणणं काय?

एकीकडे आयएसआयएसने हा इशारा दिला असतानाच दुसरीकडे न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी प्रशासन सुरक्षेसंदर्भात पूर्णपणे सतर्क असल्याचं सांगितलं आहे. वर्ल्ड कपचे सामने कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावेत यासाठी आम्ही कटीबद्ध असून आमच्याकडून कोणतीही कसर सोडली जाणार नाही असं म्हटलं आहे. ही स्पर्धा फार मोठी असून उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या लक्षात घेता हल्ल्याचा हा इशारा हलक्यात घेतला जाणार नसल्याचं नासो काऊंटीचे पोलीस अधिकारी पॅट्रिक रायडर यांनी म्हटलं आहे. 

लोन वुल्फ हल्ला रोखण्यासाठी विशेष तयारी

न्यूयॉर्क पोलिसांनी लोन वुल्फ हल्ला रोखण्यासाठी विशेष तयारी केली असून या मैदानाला यापूर्वी कधीही जेवढी सुरक्षा देण्यात आलेली नव्हती तेवढी सुरक्षा पुरवली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

आयसीसीने काय म्हटलं?

आयसीसीच्या प्रवक्त्यांनी या धमकीनंतर आयसीसीची भूमिका स्पष्ट केली आहे. "या स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वांची सुरक्षा हे आमचं सर्वात पहिलं प्राधान्य आहे. आम्ही यासाठी सर्व सुरक्षा उपाययोजना केलेल्या आहेत. आम्ही येथील प्रशासनाबरोबर एकत्रितपणे काम करत असून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन आहोत," असं आयसीसीने सांगितलं आहे.

पहिल्यांदाच अशी धमकी आलेली नाही

अशाप्रकारच्या हल्ल्याची धमकी पहिल्यांदाच देण्यात आली आहे असं नाही. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आयएसआयएसकडून मॅट्रीक्स डॉट ओरजीवरील ऑनलाइन चॅट रुम नेटवर्कचा वापर करुन या स्पर्धेवरील हल्ल्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.