टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं?

Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे

राजीव कासले | Updated: Jun 15, 2024, 06:38 PM IST
टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं? title=

Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टी20 वर्ल्ड कप 2024 साठी बीसीसीआयने 15 खेळाडूंचा संघ पाठवला आहे. तर चार खेळाडूंना राखीव (Reserved Player) ठेवण्यात आलं आहे. यात शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान आणि खलिल अहमदचा समावेश आहे. यापैकी शुभमन गिल (Shubhman Gill) आणि आवेश खानला टीम इंडियाने रिलीज केलं असून भारत-कॅनडा सामन्यानंतर मायदेशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिस्तभंगाच्या कारणावरुन गिलला भारतात परत पाठवण्यात येणार आहे. 

शुभमन गिलवर टीम व्यवस्थापन नाराज
मीडिया रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपदरम्यान शुभमन गिलला टीम इंडियाबरोबर राहायचं होतं, पण तो वेगळी कामं करत होता. गिल आपल्या वैयक्तिक व्यवसायासाठी न्यूयॉर्कमध्ये जास्त सक्रिय दिसला. या कारणामुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर नाराज असून त्याला भारतात परत जाण्यास सांगण्यात आलं आहे. टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाबरोबर रंगणार आहे. फ्लोरिडामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया सुपर-8 साठी वेस्ट इंडिजला रवाना होईल. पण शुभमन गिल आणि आवेश खान टीम इंडियाबरोबर नसतील. केवळ रिंकू सिंग आणि खलील अहमद टीम इंडियाबरोबर प्रवास करतील. 

भारत-पाकिस्तान सामन्यावेळी गिल गायब
टीम इंडिया अमेरिकेत पोहोचल्यापासूनच शुभमन गिल संघाबरोबर नाहीए. टीम इंडियाबरोबर सराव करण्याऐवजी शुभमन गिल वैयक्तिक कामाचं नियोजन करण्यात बराच वेळ घालवत होता. इतकंच काय तर भारत-पाकिस्तानदरम्यानच्या महत्त्वाच्या सामन्यावेळी देखील स्टँडमध्ये खलील अहमद, आवेश खान आणि रिंकू सिंह टीम इंडियाला चिअर करण्यासाठी उपस्थित होते. मात्र शुभमन गिल गायब होता. ही बाब संघ व्यवस्थापनाने गांभीर्याने घेतली आहे. 

रोहित शर्माला केलं अनफॉलो
शुभमन गिल आणि संघ व्यवस्थापनादरम्यानच्या वादात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार शुभमन गिलने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. यामुळे गिल आणि रोहित शर्मामध्ये वाद निर्माण झाल्याचं बोललं जातंय. या वादामुळे टीम इंडियात उभी फूट पडल्याच्या चर्चाही रंगल्या आहे. टीम इंजिया सध्या अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये आहे 

टीम इंडियाचे सुपर-8 सामने
ग्रुप ए मध्ये सलग तीन सामने जिंकत टीम इंडियाने सुपर-8 मध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. आता सुपर-8 मध्ये टीम इंडियाला तीन सामने खेळायचे असून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताबरोबर दोन हात करणार आहे. तिसरा संघ अद्याप ठरायचा आहे.