टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सुपर 8 साठी पात्र ठरलेला असतानाही, काही गोष्टी मात्र डोकेदुखी ठरत आहेत. यातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज लयीत नसून, संघाला पूर्णपणे गोलंदाजांवर अवलंबून राहावं लागत आहे. अमेरिकेसारख्या दुबळ्या संघाविरोधात खेळताना आणि समोर फक्त 111 धावांचं आव्हान असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फक्त 3 धावांवर बाद झाला. दुसरीकडे विराट कोहली तर भोपळाही फोडू शकला नाही. भारतीय संघाला विजयासाठी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्यावर अवलंबून राहावं लागलं.
रोहित शर्मा या स्पर्धेत नेहमीप्रमाणे फॉर्ममध्ये दिसत नाही. पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकत चांगली सुरुवात केली होती. पण नंतर मात्र तो चांगली कामगिरी करु शकलेला नाही. दुसरीकडे विराट कोहली तीन सामन्यात फक्त 5 धावा करु शकला आहे.
पहिल्या फळीतील फलंदाज अपय़शी ठरत असल्याने अनेक क्रिकेटचाहते यशस्वी जैस्वालला संघात घेण्याची आणि विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची मागणी करत आहेत. पण वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने रोहित आणि विराट यांचा रेकॉर्ड पाहता त्यांच्या जोडीवर कायम राहावं असा सल्ला दिला आहे.
"नक्कीच भारताकडे उजवा-डावा फलंदाज जोडी पहिल्या क्रमांकावर खेळवण्याचा पर्याय आहे. त्यांनी दोन महान फलंदाजांना निवडलं आहे. या दोघांनी भारतीय संघ तसंच आपल्या फ्रँचाईजीसाठी फलंदाजीतून मोठं योगदान दिलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना कर्णधार म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. मला वाटतं त्यांनी त्यांच्या योजनेशी कायम राहावं. कारण विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं लागलं तर गोष्टी बिघडू शकतात," असं ब्रायन लारा म्हणाला आहे.
"मला वाटतं भारताने या दोघांच्या कॉम्बिनेशनवर कायम राहावं. ते एखाद्या क्षणी चांगली कामगिरी करतील. अमेरिकेतील स्थिती फलंदाजीसाठी अनुकूल नाही. जर तुम्ही जिंकत असाल तर बदल करणं योग्य नाही या मताचा मी आहे," असंही त्याने सांगितलं.
न्यूयॉर्कमध्ये भारताने अमेरिकेचा सात गडी राखून पराभव केला. 111 धावांचा पाठलाग करताना, सूर्यकुमार (50*) आणि शिवम दुबे (31*) यांच्या फलंदाजीमुळे भारताने 18.2 षटकांत लक्ष्य गाठलं.