T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (PakvsSa) असा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील (T20 World Cup) हा पहिला पराभव होता. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात पाकिस्तानचा 33 रन्सने विजय झाला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 185 रन्स केले. फलंदाजी करताना पाकिस्तानने 43 रन्सवर 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांच्या खेळीने पाकिस्तानला चांगली धावसंख्या गाठण्यास मदत झाली.
पाकिस्ताननंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी आली तेव्हा पाकिस्तानी गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. गोलंदाजांनी सुरुवातीपासून आफ्रिकेला ताब्यात ठेवलं. आफ्रिका फलंदाजी करत असताना पावसाने हजेरी लावली.
पावसानंतर डकवर्थ लुईसचे नियम लागू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 14 ओव्हरमध्ये 142 रन्सचं लक्ष्य मिळालं. पाऊस थांबल्यानंतर सामना सुरू झाला, तेव्हा दक्षिण आफ्रिका सामन्याचं रूप पालटू शकेल असं वाटत होतं. मात्र पावसानंतर सामना सुरु झाला तेव्हा पण पाकिस्तानने कमबॅक केलं आणि अखेरीस 33 रन्ने सामना जिंकला.