दुःख, निराशा आणि 20 दिवस! विश्वचषक हरल्यानंतर रोहित शर्माची पहिली मुलाखत... भावूक करणारा Video

Rohit Sharma Interview : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींची निराशा झाली. या स्पर्धेनंतर टम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदाच आपली भावना व्यक्त केली आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 13, 2023, 05:56 PM IST
दुःख, निराशा आणि 20 दिवस! विश्वचषक हरल्यानंतर रोहित शर्माची पहिली मुलाखत... भावूक करणारा Video title=

Rohit Sharma Interview : 19 नोव्हेंबर 2023 तो दिवस. करोडो भारतीयांबरोबरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमकडे लागलं होतं. सलग दहा सामने जिंकणारी टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली होती. स्पर्धेतील जबरदस्त कामगिरी पाहाता विश्वचषक (World Cup Final) टीम इंडियाच (Team India) जिंकणार हे जवळपास प्रत्येकाल वाटत होतं. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया सात विकेटने पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाबरोबरच भारतीय क्रिकेट चाहत्यांचं तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. या पराभवानंतर आता जवळपास वीस दिवसांनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 

दुःख, निराशा आणि आयुष्य
एक्स अकाऊंटवर रोहित शर्माच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडित  रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पराभवाच्या नैराश्यातून बाहेर कसं पडायचं हे सूचत नव्हतं. पराभवानंतर काही दिवस तर पुढे काय करायचं हेच कळत नव्हतं. पण माझं कुटुंब, मित्रपरिवाराने मला प्रोत्साहन दिलं. माझ्या सभोवतालचे वातावरण थोडे हलकं ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला याचा माझ्या आयुष्यात खूप फायदा झाला. ही सोपी गोष्ट नव्हती, पण आयुष्य पुढे जात असतं, आणि आपल्याला त्याबरोबर चालायचं असंत असं रोहितने आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

मी 50 षटकांची विश्वचषक स्पर्धा पाहात मोठा झालोय, इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचं भाग्य मला लाभलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या विश्वचषक स्पर्धेत आम्ही खूप मेहनत केली. पण इतक्या प्रयत्नांनंतरही जी गोष्ट आपल्याला हवी असते ती मिळाली नाही की निराश व्हायला होतं. आयुष्यभर ज्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं, त्या गोष्टीच्या इतक्या जवळ पोहोचूनही गमावल्याचं दु:ख मोठं आहे. आम्ही आमच्याकडू सर्व प्रयत्न केल्याचं रोहितने सांगितलंय. 

नेमकं काय चुकलं?
नेमकं काय चुकलं यावरही रोहितने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही सलग दहा सामने जिंकलो, पण यातही आमच्याकडून काही चूका झाल्या. पण जेव्हा तुम्हा मैदानावर खेळता तेव्हा काही चूका या होतातच. कोणीही शंभर टक्के बरोबर नसतं. पण मला माझ्या संघावर गर्व आहे. ज्या पद्धतीने टीम इंडियाने विश्वचषकात कामगिरी केली ती जबरदस्त होती. विश्वचषकात टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळली त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना नक्कीच आनंद मिळाला असेल. आमचा खेळ पाहून भारतीयांना नक्कीच गर्व वाटला असेलं असंही रोहितने म्हटलं आहे. 

स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहित शर्माने आयुष्यात पुढे जाणं सोप नसल्याचं म्हटलं आहे. विश्वचषक स्पर्धेतील पराभवानंतर पुनरागमन करणं खूप कठिण होतं. त्यामुळे स्पर्धेनंतर काही दिवस बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पराभवाचं दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत होतो. स्पर्धेत आम्ही ज्या स्टेडिअममध्ये खेळलो तिथे चाहत्यांचा आम्हाला खूप प्रेम मिळालं. पण त्या गोष्टींबद्दल जितका जास्त विचार करु तितकं आणखी वाईट वाटेल असं रोहितने या मुलाखतीत म्हटलं आहे.