टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा 'सगळ्यात मोठा' विक्रम

भारतीय टीमने न्यूझीलंड दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली आहे. 

Updated: Jan 24, 2020, 06:46 PM IST
टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा 'सगळ्यात मोठा' विक्रम

ऑकलंड : भारतीय टीमने न्यूझीलंड दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २०४ रनच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग भारताने १९ ओव्हरमध्येच केला. परदेशातला भारताचा हा सगळ्यात मोठा टी-२० विजय आहे. याचबरोबर सर्वाधिक वेळा २०० पेक्षा जास्त रनचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही भारताने केला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताने चौथ्यांदा २०० पेक्षा जास्त रनचं आव्हान असताना मॅच जिंकली आहे. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाने दोनवेळा २०० पेक्षा जास्त रनचा यशस्वी पाठलाग केला. तर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि कतारने प्रत्येकी १-१ वेळा २०० पेक्षा जास्त रनचं आव्हान पूर्ण केलं.

भारताने २००९ साली मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध २०७ रनचं लक्ष्य गाठलं. यानंतर २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२ रन, २०१९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध २०८ रनचा यशस्वी पाठलाग भारताने केला. या यादीमध्ये आता न्यूझीलंडविरुद्धच्या २०४ रनचाही समावेश झाला आहे.

पहिल्या टी-२० मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये २०३/५ एवढा स्कोअर केला. कॉलिन मुन्रोने सर्वाधिक ५९ रन केले, तर रॉस टेलरने ५४ आणि कर्णधार केन विलियमसनने ५१ रनची खेळी केली. मार्टिन गप्टील ३० रन करुन माघारी परतला.

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ५८ रन केले. केएल राहुलने ५६ आणि कोहलीने ४५ रनची खेळी केली. भारताने १९ ओव्हरमध्येच हे आव्हान पार केलं.