मुंबई : टीम इंडियाने (Indian Cricket Team) इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने केला. आता रोहितसेना विंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाने इंग्लंडसारख्या मजबूत आणि आक्रमक संघाविरुद्ध टी 20 आणि वनडे मालिका जिंकली. तर कसोटी मालिका बरोबरीत सोडवली. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका जिंकून कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड जोडीने अनेक विक्रम कायम राखले. (team india win 7 series in under captain rohit sharma and coach rahul dravid)
विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी टी 20 वर्ल्ड कप 2021 नंतर कर्णधारपदाचा आणि प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. यानंतर या दोघांची जागा रोहित आणि राहुल द्रविड या जोडीने घेतली.
रोहितला आधी टी 20 टीमची कॅप्टन्सी मिळाली. त्यानंतर एकदिवसीय संघांचे नेतृत्व देण्यात आलं. तर सरतेशेवटी कसोटी संघाची सूत्र सोपवण्यात आली.
रोहित आणि द्रविड या जोडीची न्यूझीलंड विरुद्धची पहिली सीरिज ठरली. या मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडवर 3-0 ने दणदणीत विजय मिळवला. यानंतर कसोटी मालिका पार पडली. यामध्ये पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणेने तर दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने नेतृत्व केलं.
न्यूझीलंडनतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरुद्ध भिडली. उभयसंघात कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. मात्र इथं नेतृत्वाची जबाबदारी ही विराट आणि केएल राहुलचकडे होती.
रोहितने विडिंज विरुद्धच्या मालिकेतून कॅप्टन म्हणून पुन्हा एन्ट्री घेतली. रोहितने वनडेनंतर टी 20 सीरिजमध्येही विंडिजला धुळ चारली. यानंतर श्रीलंका भारत दौऱ्यावर आली. मात्र टीम इंडियानेही श्रीलंकाचीही वाईट स्थिती केली.
टीम इंडियाने श्रीलंकेचा प्रत्येक सामन्यात पराभव केला. त्यानंतर आयपीएल पार पडलं. आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्ध टी 20 सीरिज खेळली. मात्र या दोन्ही मालिकांमध्ये राहुल-रोहित जोडी नव्हती.
राहुल-रोहितसाठी कॅप्टन-कोच म्हणून पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यानिमित्ताने परदेशात खेळत होती. टीमसमोर इंग्लंडचं कडवं आणि मजबूत आव्हान होतं. रोहितही कोरोनामधून नुकताच सावरला होता. यानंतरही टीम इंडियाने इंग्लंडला पाणी पाजलं आणि मालिका जिंकली.
दूसरा सामनाही टीम इंडियाने सहजासहजी जिंकला आणि सीरिज आपल्या नावे केली. तिसऱ्या सामन्यात अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. राहुल आणि रोहितचा हा पहिलाच पराभव होता. मात्र, सीरिजटीम इंडियानेच जिंकली.
टी 20 सारिजनंतर टीम इंडियासमोर आता पेच होता तो एकदिवसीय मालिकेचा. टीम इंडियासमोर जो रुटचं तगडं आव्हान होतं. मात्र टीम इंडियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला गुंडाळलं.
रोहितसेनेने इंग्लंडला पहिल्या सामन्यात 110 धावांवर ऑलआऊट केलं आणि 10 विकेट्सने सामना जिंकला. टीम इंडियाचा हा इंग्लंडवर मिळवलेला सर्वात मोठा विजय होता.
टीम इंडियाला दुसऱ्या सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. मात्र इंग्लंडने मुसंडी मारत दुसऱ्या सामन्यात भारताचा 100 धावांनी पराभव केला. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आली. त्यामुळे आता तिसरा सामना हा निर्णायक होणार होता.
मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना समसमान संधी होती. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 259 धावांवर रोखलं, त्यामुळे विजयासाठी 260 धावांचं आव्हान मिळालं. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक स्थिती झाली. अवघ्या 72 धावावंर 4 विकेट्स अशी स्थिती झाली होती.
मात्र यानंतर ऋषभ पंत-हार्दिक पंड्या या जोडीने निर्णायक शतकी भागीदारी केली. या भागीदारीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. पंतने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलंवहिलं खणखणीत शतक ठोकलं. तर पंड्याने अर्धशतक केलं. यामुळे भारताने अवघड वाटत असलेला सामना सहजासहजी 5 विकेट्सने जिंकला.
या विजयासह राहुल-रोहित जोडीने अंजिक्य राहण्याचा कारनामा कायम ठेवला. या जोडीने आतापर्यंत खेळलेल्या सर्व 7 मालिकांमध्ये विजय मिळवलेला आहे. या 7 पैकी 5 मालिका या भारतात तर 2 इंग्लंडमध्ये झाल्या. यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंड, विंडिज, श्रीलंका आणि इंग्लंडचा पराभव केला.