मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान कोलकाता नाईड रायडर्सकडून भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने बरीच मेहनत घेतलीये. दरम्यान टीम प्ले ऑफमध्ये पोहोचवण्यासाठी कार्तिकची मोलाची भूमिका होती. तर आयपीएलमध्ये खेळण्यावरून एक मोठा खुलासा झाला आहे.
अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक प्लेऑफमध्ये इंजेक्शन घेतल्यानंतर खेळला असल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव एस रामास्वामी यांनी हा खुलासा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश कार्तिक गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. यामुळे त्याला पेनकिलरचे इंजेक्शन घ्यावं लागलं. दुखापतीमुळे राइट हँड फलंदाज 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक टी -20 करंडकाच्या आगामी मोसमाला मुकणार आहे.
या स्पर्धेत कार्तिक तामिळनाडूचं नेतृत्व करणार होता. पण आता कार्तिकच्या अनुपस्थितीत विजय शंकरला संघाचे कर्णधार बनवण्यात आलं आहे. या टी-20 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात तामिळनाडूचा सामना महाराष्ट्राशी होणार आहे. तर या लीगचा अंतिम सामना 24 नोव्हेंबरला होणार आहे.
रामास्वामी यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, "इंजेक्शन घेतल्यानंतर दिनेश कार्तिक आयपीएल प्लेऑफ खेळला. त्यामुळे आता आम्ही त्याला सय्यद मुश्ताक करंडकासाठी विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी विजय शंकर तामिळनाडू टीमचं नेतृत्व करणार आहे."