डकवर्थ-लुईस नियमाला जन्म देणाऱ्या लुईस यांचं निधन

मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पावसामुळे प्रभावित झालेल्या मॅचसाठी डकवर्थ-लुईस-स्टर्न नियम तयार करण्यात आले.

Updated: Apr 2, 2020, 09:27 PM IST
डकवर्थ-लुईस नियमाला जन्म देणाऱ्या लुईस यांचं निधन

लंडन : मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पावसामुळे प्रभावित झालेल्या मॅचसाठी डकवर्थ-लुईस-स्टर्न नियम तयार करण्यात आले. हे नियम बनवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या टोनी लुईस यांचं निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. लुईस यांच्या निधनबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी)ने प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे. 'लुईस यांच्या निधनाने ईसीबीला दु:ख झालं आहे. टोनी लुईस यांनी आपले मित्र गणितज्ज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्या मदतीने डकवर्थ-लुईस नियम तयार केला. १९९७ साली या नियमाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. आयसीसीने १९९९ साली या नियमांची अंमलबजावणी करायला सुरुवात केली,' असं ईसीबीने म्हणलं आहे.

२०१४ साली या नियमाला डकवर्थ-लुईस-स्टर्न असं नाव देण्यात आलं. आजही पावासामुळे प्रभावित झालेल्या मॅचसाठी हा नियम लागू होतो. टोनी लुईस क्रिकेटपटू नव्हते, पण क्रिकेट आणि गणितातल्या योगदानाबद्दल त्यांना २०१० साली ब्रिटीश साम्राज्याने एमबीई हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. २०१४ साली ऑस्ट्रेलियाचे प्रोफेसर स्टीवेन स्टर्न यांनी या नियमांमध्ये काही बदल केले. त्यामुळे या नियमाचं नाव डकवर्थ-लुईस-स्टर्न असं ठेवण्यात आलं.

डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमांना आयसीसीने २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपपासून लागू करण्यात आलं. हा नियम लोकप्रिय असला तरी टी-२० क्रिकेटमध्ये मात्र त्याच्यावर टीकाही होते. टी-२० सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला या नियमाचा फायदा होतो. त्यामुळे या नियमांवर आक्षेपही घेतले जातात.